
जीपीटी मानवी भाषेची नक्कल करू शकते; परंतु ते मानवासारखे विचार करू शकत नाही. मानवांनी तयार केलेला मजकूर अधिक विचारपूर्वक आणि सर्जनशील असतो. चॅटजीपीटी हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे, जे आपले जीवन अनेक मार्गांनी सोपे करू शकते. पण ते एक साधन आहे, जादूची कांडी नाही. त्याचा वापर कसा करायचा, हे आपल्या हातात आहे.
कधी तरी तुमच्या मुलाने शाळेचा निबंध लिहिण्यासाठी, ऑफिसमधील सहकाऱ्याने एका महत्त्वाच्या ई-मेलचा मसुदा तयार करण्यासाठी किंवा अगदी तुमच्या मित्राने फिरायला जाण्याचा प्लॅन तयार करण्यासाठी एका वेबसाइटची मदत घेतल्याचे तुम्ही ऐकले असेल. ही वेबसाइट म्हणजे चॅटजीपीटी! आजकाल सगळीकडे याच नावाची चर्चा आहे. पण, हा चॅटजीपीटी नावाचा प्रकार आहे तरी काय? ही कोणती जादू आहे, की एखादे विचार करणारे यंत्र? आपल्या दैनंदिन जीवनात डोकावणाऱ्या या तंत्रज्ञानाचे रहस्य सोप्या आणि आपल्या मराठी भाषेत उलगडून पाहूया.
‘जीपीटी’ म्हणजे काय? एका महाकाय ग्रंथालयाची कल्पना करा. सुरुवात करूया, काही शब्दांच्या अर्थापासून. तुम्ही ‘एआय’ म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा शब्द ऐकला असेल. याच ‘एआय’चा एक प्रकार म्हणजे ‘एलएलएम’ (LLM), ज्याचा अर्थ आहे ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’... याला आपण एक असे महाकाय ग्रंथालय समजू शकतो, जिथे जगातली सर्व पुस्तके, लेख आणि वेबसाइट्समधील माहिती साठवलेली आहे. आता या ग्रंथालयातून शिकून तयार झालेला एक अतिशय हुशार विद्यार्थी म्हणजे ‘जीपीटी’. जीपीटी हे ‘ओपनएआय’ (OpenAI) नावाच्या कंपनीने तयार केलेले एक विशिष्ट ‘एलएलएम’ आहे. याची सर्वात सोपी ओळख म्हणजे, तुमच्या मोबाईलमधील शब्दांची आपोआप पुढची अक्षरे सुचवणारी प्रणाली (Autocomplete).
तुम्ही एक शब्द लिहायला सुरुवात करता आणि मोबाईल तुम्हाला पुढचा संभाव्य शब्द सुचवतो. जीपीटी हे त्याचेच एक अत्यंत प्रगत रूप आहे. ते फक्त पुढचा शब्द नाही, तर पुढचे वाक्य, पुढचा परिच्छेद आणि अगदी संपूर्ण लेख किंवा कविता तयार करण्याची क्षमता ठेवते. तुम्ही त्याला एक विषय दिला, की ते एकामागून एक सुसंगत शब्द जोडून एक अर्थपूर्ण लिखाण तयार करते.