

Chhatrapati Sambhajinagar Mahapalika
esakal
तीन दशकांपूर्वी मुंबई, पुणे, नागपूरनंतर छत्रपती संभाजीनगरचा क्रमांक लागायचा. मराठवाड्याची राजधानी व राज्यातील इतर विकसित शहराच्या तुलनेत अनेक बाबतीत हे शहर मागे पडत आहे. खरे पाहता इथला वैभवशाली इतिहास, पर्यटन व भविष्यातले औद्योगिक शहर या पायावर छत्रपती संभाजीनगर राज्यातील एक महत्त्वाचे शहर बनू शकते. नवे लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व जागरूक नागरिक यांच्या बळावर ही इच्छाशक्ती आगामी काळात नावारूपाला यायला हवी. त्यासाठी फार मोठ्या विकासाच्या अपेक्षा नाहीत. केवळ सुनिश्चित व गतिशील प्रवाह निर्माण झाला तरी पुरेसे आहे.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका दीर्घ अवधीनंतर झाल्या निकालही लागले. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक तब्बल एका दशकानंतर झाली. या दरम्यान निवडणूक दृष्टीने एक पिढी राजकारणात येण्यापूर्वीच गारद झाली. छत्रपती संभाजीनगरचे नाव तीन दशकांपूर्वी बोलताना मुंबई, पुणे, नागपूर नंतर चौथे यायचे. कधी काळी चौथ्या स्थानावर असणारे शहर सहाव्या सातव्या स्थानासाठी स्पर्धा करतेय. उद्योग आले. पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण झाली, वगैरे म्हणजे विकसित शहर व्याख्येत बसत नाही. शहराचे जीवनमान किती उंचावले? मूलभूत सुविधांच्या पूर्ततेची टक्केवारी किती आहे? हा विचारही लक्षात घेतला तरच शहर विकासाला अर्थ उरेल. नगर नियोजन आणि ‘लिव्हेबल सिटी’ अर्थात राहण्यायोग्य शहर. बाकी परिमाणं आहेतच पण किमान जिथे सुसह्य वावर शक्य होईल, असे शहर.