

Chh. Shivaji Maharaj Diplomacy
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ रणांगणावरच नव्हे, तर आपल्या प्रगल्भ मुत्सद्देगिरीने इंग्रजांना वाटाघाटींत नमवून शाश्वत राजकीय विजय मिळवला. राजांचा राज्याभिषेक ही भारतीय इतिहासातील अभूतपूर्व घटना होती; यातून राजांनी स्वतःची कालगणना निर्माण केली, नाणी पाडली व स्वराज्याला कायदेशीर सार्वभौमत्व मिळवून दिले. गैरसोयीच्या अटी झुगारून मुघलांना केवळ वाटाघाटींच्या जाळ्यात गुंतवून ठेवणे, हे त्यांच्या अजोड दूरदृष्टीचे उत्तम प्रतीक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ रणांगणावरील युद्ध जिंकली नाहीत, तर त्यांनी मुत्सद्देगिरीने चर्चा व वाटाघाटींद्वारे होणारी कूटयुद्धे देखील तितक्याच प्रगल्भतेने जिंकली. इंग्रजांसोबतचा त्यांचा संघर्ष देखील वाटाघाटींच्या टेबलावर लढल्या गेलेल्या कूटयुद्धाचाच एक उत्कृष्ट नमुना आहे. राजापूर व इतर बंदरांमध्ये शिवसैन्याद्वारे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी इंग्रजांनी अत्यंत चिवटपणे लावून धरली होती. राजांनी मात्र थॉमस निकल्स, नारायण शेणवी यांसारख्या इंग्रज दूतांशी वाटाघाटी करत ‘साम, दाम, दंड, भेद’ या चतुःसूत्रीचा अत्यंत कुशलतेने वापर करत जगावर राज्य करू इच्छिणाऱ्या या व्यापारी सत्तेला पुरते नमवले.
इंग्रजांनी राजापूर लुटीपोटी ३९,९५७ होन इतक्या अवाढव्य रकमेचा दावा केला असता, राजांनी आपल्या दप्तरखान्यातील जुनी नोंदवही (ज्यात केवळ ४,००० होन इतकाच माल मिळाल्याची नोंद होती) समोर ठेवून त्यांचा खोटा दावा उघडा पाडला. या वाटाघाटींमध्ये राजांनी लष्करी आणि आर्थिक नाकेबंदीचे देखील उत्तम तंत्र वापरले. इंग्रजांनी आडमुठी भूमिका घेतल्यास स्वराज्यातून जाणारी रसद तोडून मुंबईत दुष्काळ घडवण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचे राजांनी त्यांना ठणकावून सांगितले. त्याचवेळी, माझगाव येथे सिद्दीची जहाजे जाळण्याची योजना आखून राजांनी त्यांना बचावात्मक स्थितीत ढकलले. शिवाय, डच व इंग्रज यांच्यातील आंतरराष्ट्रीय वैराचा फायदा घेत, डचांशी युती करण्याची भीती दाखवून राजांनी भूराजकीय पारडे आपल्या बाजूने झुकवले. स्वराज्यातील मालाचे मोठे खरेदीदार असल्याने राजांनी इंग्रजांना पूर्णपणे दुखावले नाही; उलट दबाव तंत्राचा वापर करून मनाजोगत्या सवलती मिळवल्या. राजापूर येथे वखार पुन्हा उभी करण्यास प्रोत्साहन दिले, जकातीत भरपूर सवलत दिली. याशिवाय मराठ्यांची एक वखार ‘मुंबई’ येथे उभी करण्यास मान्यता मिळविली. ‘इतर कोणत्याही राज्यकर्त्यांना न देता, केवळ मैत्रीखातर आपण तुम्हांला ही भरपाई देत आहोत!’ हे ठसवून राजांनी स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवले. (इं. रे. ऑ. शि. खंड १, नं. ३३९ ते ४२९). म्हणूनच, रणांगणातील हिंसक विजयापेक्षा राजनैतिक टेबलावर मुत्सद्देगिरीने मिळवलेला विजय हा अधिक शाश्वत आणि श्रेष्ठ मानला जातो.
n इंग्रजांशी तह ः मुंबई ते रायगड या सततच्या प्रवासात वेळ, श्रम, पैसे खर्च होत असूनही इंग्रज चिकाटीने भरपाईसाठी प्रयत्न करीत होते. अखेर अनेक वाटाघाटीअंती, नुकसान भरपाई म्हणून नव्हे तर ‘सदिच्छेपोटी बक्षिस म्हणून’ काही रक्कम राजांनी इंग्रजांना देऊ केली. यासाठी शिवाजीराजे व हेन्री ऑक्सिंडेन यांची २६ मे १६७४ रोजी भेट झाली आणि ११ जून १६७४ रोजी राजांनी इंग्रजांसोबतच्या तहावर शिक्कामोर्तब केला.
या तहाच्या पूर्ततेसाठी व राज्याभिषेकाच्या समारंभासाठी हेन्री ऑक्सिंडेन, जॉर्ज रॉबिन्सन व थॉमस मिचेल हे १३ मे १६७४ रोजी मुंबईहून जहाजाद्वारे निघाले. कुंडलिका (चौल) नदीतून प्रवास करत १६ मे रोजी अष्टमी येथे आले. नंतर १७ मे रोजी निजामपूर आणि १९ मे रोजी सकाळी ९ वाजता पाचाड येथे पोहोचले. ते २२ मे रोजी रायगडावर दाखल झाले आणि तहाची पुर्तता झाल्यावर १३ जूनला माघारी निघाले व १६ जून १६७४ रोजी मुंबईला पोहोचले. या संपूर्ण प्रवासाचा वृत्तांत देणारी हेन्री ऑक्सिंडेन याने लिहिलेली रोजनिशी (डायरी) आजही उपलब्ध आहे.