
Cartoon influence on kids
esakal
खरंतर आज भारतातील प्रत्येक लहान मूल कार्टून्स बघतं. जग काय आहे, कसं आहे याची त्याला नकळत तिथे ओळख व्हायला लागते. जे कार्टून लहान मुलांसाठी आहे त्यामधील नायक हा मोठ्या माणसांच्या नायकासारखा वागतो, हे कार्टून्स बनवणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं ना! तुमच्या कार्टूनची रंजकता वाढवण्यासाठी तुम्ही लहान मुलांच्या भावविश्वामध्ये ढवळाढवळ करणार का?
‘अहो, या कार्टून्सवर कोणाचं लक्ष आहे की नाही?’ शाळेच्या कम्पाउंडच्या भिंतीला पाठ टेकवत नंदिनी प्रियाला म्हणाली. शाळा सुटायला अजून वेळ होता. ‘‘असं कसं म्हणता? सरकारचं सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष असतं. कार्टून बरं सुटेल त्यातून?’’ प्रिया मोबाईलचे सगळे ॲप मिनीमाईज करीत म्हणाली. ‘‘मला नाही वाटत तसं’’ नंदिनीने आपलं म्हणणं पुन्हा एकदा ठामपणे मांडलं. प्रियाने एक क्षण मोबाईलमध्ये बघितलं. अजून पंधरा मिनिटं होती शाळेची बेल वाजायला. मोबाईलमधील घड्याळ बघून तिने ठरवलं, चला चर्चेत हिरिरीने भाग घेऊ या. प्रियाने प्रश्न केला, ‘‘का तुम्हाला वाटतंय की कार्टून्सवर कोणाचं लक्ष नाही? असणार आहे लक्ष. आता बघा, फिल्मला असतं ना ते... ते... काय हो त्याचं नाव? आई गं... इथे आहे बघा नाव ओठावर, पण बाहेर येईना... ते कट सांगतात बघा, पिच्चर इथे कापा तिथे कापा, ते लोक...’’ ‘‘सेन्सॉर बोर्ड?’’ नंदिनी म्हणाली. ‘‘हो हो सेन्सॉर बोर्ड... घ्या, मुलं अजून शाळेत आहेत आणि मला शब्द विसरायला होत आहेत. लवकर म्हातारी होण्याचं लक्षण! दुसरं काय?’’ विनाकारण ओढणी सांभाळत प्रिया आपल्याच विनोदावर हसायला लागली.