

Future of Industrial Automation China
esakal
चीनची एक मोठी यंत्रक्रांती आकाराला येत आहे. जगातील ९० टक्के ह्युमनॉइड रोबो सध्या चीनमध्ये तयार होतात. चीनमध्ये सध्या दहा लाखांहून अधिक रोबोटिक्स कंपन्या असून १५० कंपन्या विशेषतः ह्युमनॉइड रोबोंवर काम करत आहेत. जर हे ‘रोबो ट्रेनिंग फार्म्स’ उपयुक्त डेटा तयार करण्यात यशस्वी झाले; तर पुढील औद्योगिक क्रांतीवर चीनचे नियंत्रण असेल.
बीजिंगच्या उपनगरातील औद्योगिक केंद्रांमध्ये चीनची एक मोठी यंत्रक्रांती आकाराला येत आहे. येथे हुबेहूब माणसासारखे दिसणारे ‘ह्युमनॉइड’ रोबो रांगेत उभे असून, तरुण कामगार व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) हेडसेटद्वारे त्यांच्या प्रत्येक हालचालीचे थेट मार्गदर्शन करत आहेत. या केंद्रांना ‘रोबो ट्रेनिंग फार्म्स’ म्हटले जाते. येथे ‘इमिटेशन लर्निंग’ तंत्राचा वापर करून रोबोंना शर्टची घडी घालणे किंवा कुलूप उघडणे यांसारखी मानवी कौशल्ये शिकवली जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील हा जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि खर्चिक प्रयोग असून, चीनने अशा चाळीसहून अधिक सुविधा उभारल्या आहेत. अल्गोरिदमपेक्षा प्रत्यक्ष मानवी श्रमाच्या ‘ब्रूट फोर्स’वर आधारित ही मोहीम आहे. भविष्यातील औद्योगिक क्रांतीसाठी लागणारा ‘फिजिकल डेटा’ गोळा करणे, हा या अवाढव्य मानवी कसरतीमागील मुख्य उद्देश आहे.