Premium|China's Global Rise : चीनचा जागतिक उदय भारतासाठी किती महत्त्वाचा ठरणार?

China’s Rise and Global Power Shift : चीनचा आर्थिक, व्यापारी आणि लष्करी प्रभाव वेगाने वाढत असून जागतिक सत्तासमीकरणे बदलत आहेत. चीनची महत्त्वाकांक्षा, जागतिक रणनीती आणि भारतासमोरील आव्हाने समजून घेणे आता महत्त्वाचे ठरत आहे.
China’s Rise and Global Power Shift

China’s Rise and Global Power Shift

esakal

Updated on: 

विजय गाेखले - vijaygok59@gmail.com

भूराजकारणाच्या पटावर चीनचा उदय म्हणजे केवळ एका देशाच्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यवाढीची कहाणी नाही; तर ती जागतिक सत्तासमीकरणे बदलणारी घडामोड आहे. जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी पुन्हा स्थान मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा चीन व्यापार, तंत्रज्ञान, लष्करी सामर्थ्य आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून आपला प्रभाव विस्तारत आहे.

चीनच्या महत्त्वाकांक्षेमागील त्याचा दृष्टिकोन, त्याची अंतर्गत आव्हाने आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेतील त्याची रणनीती समजून घेणे भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

आपल्या आयुष्यातील कदाचित सर्वांत महत्त्वाची आणि दूरगामी घडामोड म्हणजे चीनचा जागतिक स्तरावरील उदय असेल. जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून चीनने आधीच स्थान मिळवले आहे. तिचा जीडीपी २० ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतका आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास पाऊण पट आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि जर्मनीला मागे टाकत चीन जगातील सर्वांत मोठा व्यापारी देशही बनला आहे. चीनचा एकूण व्यापार सहा ट्रिलियन अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक असून, त्याचा व्यापार अधिशेष (ट्रेड सरप्लस) एक ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी चीनचा व्यापार अधिशेष भारताच्या एकूण व्यापार संतुलनापेक्षाही अधिक होता. या तुलनेतून चीनची प्रचंड आर्थिक क्षमता आणि जागतिक व्यापारातील त्याचे वर्चस्व अधोरेखित होते.

जागतिक उत्पादनातील चीनचा वाटा सध्या सुमारे ३० टक्के आहे. अमेरिका, जर्मनी आणि जपान यांच्या एकत्रित योगदानापेक्षाही तो अधिक आहे. त्यामुळेच चीनने ‘जगाचा कारखाना’ अशी ओळख निर्माण केली आहे. चिनी अर्थव्यवस्थेचे हे जागतिक वर्चस्व केवळ व्यापारापुरते मर्यादित नसून, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावरही थेट आणि व्यक्तिगत पातळीवर परिणाम होत असतो.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ऑक्टोबर २०१७मध्ये झालेल्या कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. ते म्हणाले होते, ‘पुढील तीस वर्षे हे असे युग असेल, ज्यात चीन जागतिक मंचावर केंद्रस्थानी जाण्याच्या आणि मानवजातीसाठी अधिक मोठे योगदान देण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल.’ या विधानाचा सार असा, की या शतकात आपण चीनला वगळून जगाची कल्पनाही करू शकणार नाही. त्यामुळे येत्या २५ वर्षांत चीन जगाकडे कसे पाहतो, जागतिक व्यवस्थेशी कसा जुळवून घेतो, जगाच्या जडणघडणीवर कसा प्रभाव टाकतो आणि त्यासाठी कोणती साधने वापरतो, याचे सखोल आकलन करून घेणे आवश्यक आहे. हे आकलन भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने तसेच व्यापक जागतिक कल्याणासाठीही निर्णायक ठरणार आहे.

आजची बौद्धिक चर्चा प्रामुख्याने पाश्चात्त्य जगातील संशोधन आणि दृष्टिकोनांवर आधारलेली असते. चीन मात्र भौगोलिकदृष्ट्या भारताच्या अगदी जवळ आहे. शेकडो मैलांचे अंतर किंवा खंड आणि महासागरांनी या दोन देशांना विभक्त केलेले नाही. त्यामुळे चीनमधील घडामोडींकडे भारतीयांनी स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि त्यांचे स्वतंत्र आकलन विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पाश्चात्त्य दृष्टिकोन आणि नोंदींवर विसंबून राहून चीनविषयी गैरसमज किंवा चुकीचे अंदाज बांधले गेल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

‘सिक मॅन ऑफ एशिया’च्या आठवणी नकोत

चीन जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, हे समजून घेण्यासाठी चिनी नागरिक स्वतःकडे कसे पाहतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चिनी नागरिक आपली संस्कृती प्राचीन असल्याचे मानतात. १८४० पूर्वीही जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख चालक आपणच होतो, अशी त्यांची धारणा आहे. मात्र त्यानंतरच्या काळात चीनला अर्धवसाहतीचे स्वरूप प्राप्त झाले आणि त्याच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करावी लागली, याची सल त्यांच्या मनात आजही कायम आहे. जागतिक इतिहासातील आपले स्थान काय होते, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या मनात ‘पीडित’ असल्याची भावनाही खोलवर रुजलेली आहे. चीनची राजकीय व्यवस्था एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत देशाची झालेली घसरण ही प्रामुख्याने परकीय हस्तक्षेपामुळेच झाली, असे मानते आणि हाच दृष्टिकोन समाजात रुजवते. त्यामुळे एकेकाळी चीनसाठी वापरल्या गेलेल्या ‘सिक मॅन ऑफ एशिया’च्या आठवणी पुसून टाकण्याची त्यांची तीव्र इच्छाही दिसून येते.

चिनी कम्युनिस्ट पार्टीने (सीसीपी) चिनी जनतेच्या इतिहासाविषयीची जाणीव, पीडित असल्याची भावना आणि राष्ट्रीय अभिमान यांचा अत्यंत कौशल्याने वापर केला आहे. त्याच आधारावर केवळ आपलाच पक्ष चीनचा गमावलेला अभिमान आणि जागतिक स्थान पुन्हा प्रस्थापित करू शकतो, असा दावाही तो करतो. चीन हा सामान्य राष्ट्रांप्रमाणे कार्य करणारा देश नाही. लोकशाही देशांमध्ये सत्ताधारी पक्ष आणि देश यांच्यात स्पष्ट भेद असतो. चीनमध्ये मात्र चिनी कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच देश, अशी धारणा रुजवण्यात आली आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाची उद्दिष्टे, चिंता आणि हितसंबंध हे देशाचे बनतात. चीनमधील कायदेमंडळ आणि न्यायपालिकेसह सर्व सरकारी संस्था केवळ कम्युनिस्ट पक्षाची सत्तेवरील पकड घट्ट ठेवण्यासाठी अस्तित्वात आहेत. त्यासाठीच त्या काम करतात.

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे निरपेक्ष वर्चस्व शी जिनपिंग यांनी फेब्रुवारी २०१५मध्ये स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते, ‘चिनी कम्युनिस्ट पक्षाची निरपेक्ष सत्ता हा माझ्या देशाच्या राजकीय स्थैर्याचा, आर्थिक विकासाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक स्थिरतेचा मूलभूत आधार आहे अन् तो किंचितही डळमळीत होता कामा नये.’ अशा प्रकारे चीनचे भविष्य हे देश म्हणून जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते कम्युनिस्ट पक्षाच्या भवितव्याशीही थेट जोडलेले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व आणि सत्तेवरील त्याचे वर्चस्व टिकवून ठेवण्यास इतर कोणत्याही बाबीपेक्षा सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.

Loading content, please wait...