chirote recipe
Esakal
उमाशशी भालेराव
दिवाळी जवळ येताच चार-पाच दिवस आधीपासूनच गृहिणींची फराळ करण्याची धावपळ सुरू होते. लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळे, करंजी असे सर्व पदार्थ केले जातात. या फराळात चिरोट्यांनाही खास स्थान असते. चिरोटे करणे थोडे कठीण आणि वेळखाऊ असल्यामुळे अनेक गृहिणी ते घरी करणे टाळतात. पण आपण जरा सोप्या रेसिपी पाहू या...
साहित्य
दोन वाटी मैदा, ४ चमचे साजूक तूप, दूध किंवा पाणी, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी, तळण्यासाठी रिफाइंड तेल.
कृती
प्रथम मैद्यामध्ये तूप घालून हाताने नीट मळावे, जेणेकरून तूप संपूर्ण मैद्याला लागेल. नंतर गरजेप्रमाणे कोमट दूध किंवा पाणी घालून मैदा घट्ट भिजवावा आणि चांगला मळावा. जितके अधिक मळाल, तितके चिरोटे खुसखुशीत होतील. दोन वाट्या मैद्यामधून आठ गोळे तयार करावेत. प्रत्येक गोळा तांदळाच्या पिठीवर लाटून पातळ पोळी लाटावी. प्रत्येक पोळीवर सगळीकडे कोमट तूप लावावे आणि त्यावर तांदळाची पिठी भुरभुरावी. चार पोळ्या एकावर एक ठेवून साधारण एक इंच रुंदीची गुंडाळी करून वळकटी तयार करावी. त्यानंतर गुंडाळी केलेल्या पोळीचे एक इंचाचे आडवे चौकोनी तुकडे करावेत.
प्रत्येक तुकडा पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने उभा लाटावा. नंतर खोल तळणीच्या कढईत रिफाइंड तेल किंवा तूप गरम करून चिरोटे मंद आचेवर तळून घ्यावेत. तळताना दोन्ही बाजूने पळीने तेल किंवा तूप ओतून चिरोटा छान फुगून त्याचे पदर सुटतील याची काळजी घ्यावी. चिरोटे पांढरेशुभ्र दिसायला हवेत. तळून झाल्यानंतर चिरोटे ताटात ठेवावेत. एकावर एक न ठेवता थोड्या अंतरावर ठेवावेत. खायला देताना त्यावर आवडीप्रमाणे पिठीसाखर भुरभुरून सर्व्ह करावेत.