

Chottanikkara Bhagavathy Temple
esakal
संजीव भागवत - sakal.avtaran@gmail.com
नदी, भूमी आणि मातृशक्तीशी नाते सांगणारी चोटानिक्करा देवी केरळच्या लोकसंस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे. दंतकथा, गूढ प्रथा आणि तीन शक्तिरूपांत होणारी पूजा यांमधून तिच्या उपासनेची प्राचीन परंपरा आणि लोकविश्वासांचे अनेक पदर उलगडतात.
‘अम्मे (देवी) चोटानिक्करा भगवती, कल्पवृक्षाप्रमाणे आम्हाला तारणारी, आमच्या दुःखाचा नाश कर... अम्मे नारायणा, देवी नारायणा, लक्ष्मी नारायणा, भद्रे नारायणा...’ केरळची प्राचीन मातृदेवता असलेल्या चोटानिक्करा देवीसाठी गायले जाणारे हे लोकगीत. मूळ मल्याळम भाषेतील हे गीत स्थानिक आदिवासींसह ‘कृषिदास’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुदायातील महिलांकडून प्रामुख्याने गायले जाते. केरळच्या भूमीतील लोकदेवता म्हणून पूजल्या जाणाऱ्या चोटानिक्करा देवीविषयीच्या लोकगीतांची समृद्ध परंपरा येथे पाहायला मिळते.
कोची शहरापासून सुमारे १८ किमी अंतरावर देवी चोटानिक्कराचे मंदिर आहे. ही देवी मूळ आदिवासी समाजाची कुलदेवता आणि लोकदेवता मानली जाते. एका लोककथेनुसार, आदिवासी समाजातील एक महिला शेतजमिनीची मशागत करताना गवत कापत होती. त्या वेळी तिच्या विळ्याचा देवीच्या मूर्तीला स्पर्श झाला. विळा धारदार असल्याने मूर्तीतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. मल्याळम भाषेत अशा रक्तस्रावाला ‘चोटा’ असे म्हटले जाते. ज्या ठिकाणी देवीची मूर्ती सापडली, त्या भूमीला रक्तस्रावातून प्रकट झालेली भूमाता म्हणून ‘चोट्टू-करा’ असे संबोधले जाऊ लागले. पुढे ती भूमी ‘चोटानिक्करा’ म्हणून ओळखली जाऊ लागली.