
Bollywood Classics
esakal
नित्य नव्या कथेच्या शोधात असलेल्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी अनेकदा लेखक कवी यांचा परामर्श घेतला आहे; पण तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनीच एक विषय सुचवला. ‘आवारा’च्या प्रदर्शनाच्या वेळी पंतप्रधान पंडित नेहरू उपस्थित राहिले होते. त्या वेळी ते राज कपूर यांना म्हणाले, ‘‘तुम्ही मुलांवर चित्रपट काढावा.’’ नंतर राज कपूर यांनी ‘बूटपॉलिश’ या चित्रपटाची निर्मिती केली. आर.के.च्या परंपरेप्रमाणे प्रणय, नाट्य, संगीत असे या चित्रपटात शक्य नव्हते. संगीतासाठीही वाव नव्हता; पण राज कपूरने कथेत संगीताच्या जागा अचूक शोधल्या. संगीतकार शंकर जयकिशन यांना सहाय्यक म्हणून दत्ताराम वाडकर पुढे आले. बघता-बघता गाण्याची छान मैफल जमली.
‘नन्हे मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’, ‘हम मतवाले पॉलिशवाले’, ‘मैं बहारों की नटखट रानी’, ‘चली कौन से देश’ आणि ‘लपक झपक तू आ रे बदरवा...’शिवाय आणखी एक गाणं ‘तुम्हारे है तुम से दया माँगते हैं’ या गाण्यासाठी राज कपूरने मूकपट आणि बोलपटाच्या आरंभीचे हिरो मा. निस्सार यांना बोलावले. मा. निस्सार देखणे, उंचपुरे, गायक, नट आणि त्यांची नायिका जहाँआरा कज्जन यांनी एक इतिहास रचला होता तीस-चाळीसच्या दशकात! ‘लैला मजनू’, ‘शिरीन फरहाद’ होते ते रसिकांचे. कलकत्ता गाजवून मुंबईत आले; पण वाळकेश्वरवरील आलिशान घर, महागड्या गाड्या, श्रीमंती विलासी राहणी, अफाट लोकप्रियता ते शेवटी कामाठीपुरा भागात एका लहानशा जागेत ते निष्कांचन अवस्थेत गेले. ‘बूटपॉलिश’मध्ये ‘तुम्हारे हैं तुम से दया माँगते है’ हे गाणं गाताना ते दिसतात. भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक असेही नाट्य लपलेलं आहे. ‘बूटपॉलिश’मध्ये गहिरे रंग भरले ते जॉन चाचाची अजरामर भूमिका करणाऱ्या अब्राहम डेव्हिड यांनी आणि चिमुरड्या बेबी नाझने! सलमा बेग नावाची लहान मुलगी ‘बूटपॉलिश’ची बेबी नाझ!