

Bonded Labour System Maharashtra
esakal
शासकीय बंगल्यावर पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला व विद्युल्लताला आरोपीसारखं उभं करून गावपाड्यात जाण्यास मनाई केली होती. आज त्याच बंगल्यात आम्हाला सन्मानाने निमंत्रित केलं गेलं होतं.
‘‘सखाराम, अरे सर्वांनी बघा. सखाराम, आज तुझ्या हातावर रावसाहेब पाणी ओतताहेत.’’ ठाण्याचे जिल्हाधिकारी सखारामच्या पाठीवर हात मारून सर्वांना सांगत होते. वसईचे तहसीलदार शिवाजी बहिरव सखारामच्या हातावर पाणी घालत होते.
सखारामच्या घरी आज जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी सर्व जण जमिनीवर खाली बसून जेवले होते. जेवल्यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हातावर पाणी टाकलं तसं सखारामच्या हातावरही टाकलं.
सखाराम ३५-४० वर्षांचा. अनेक ठिकाणी ठिगळं लावलेला विरलेला शर्ट घातलेला. गतिमंद. विस्कटलेल्या केसांचा. विस्कटलेलं आयुष्य त्याच्या कपड्यावरून, केसांवरून स्पष्ट दिसत होतं. मान डोलावण्यापलीकडे सखाराम काहीच करू शकत नव्हता. कारण त्याच्याकरिता हे सारं अनाकलनीय होतं. स्वत:च्याच जमिनीवर वेठबिगार म्हणून श्रमणाऱ्या सखारामला जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी त्याच्या घरी येणं, त्याला भेटणं, त्याच्यासोबत जेवणं सारंच त्याच्या अनुभवाच्या आणि कल्पनेच्याही पलीकडलं होतं. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार फाट्याजवळ सखाराम वरठाची जमीन होती. त्या जमिनीवर सखाराम वरठा आणि त्याचं १६ कुटुंबीय यांना वेठबिगार म्हणून आप्पा देसाई यांनी ठेवलं होतं आणि त्यांना तो खाण्यापुरते पैसे देत होता. स्वत:च्याच जमिनीवर सखाराम वेठबिगारी करीत होता. सखारामला, त्याच्या कुटुंबीयांना आप्पा देसाईंच्या तावडीतून सोडवण्यासाठी आणि त्याची जमीन त्याला परत करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: विरार फाटा येथे आले होते.