
आज रेल्वे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालीय. आपल्या देशात इंग्रजांनी रेल्वे सुरू केली ती व्यापारासाठी. म्हणजे इथल्या ईस्ट इंडिया कंपनीवाल्यांना भारत हा फक्त व्यापारपेठ म्हणूनच दिसत होता. इथून जेवढा काही मलिदा नेता येईल तेवढा त्यांना न्यायचा होता. इथून कंपनी सरकारचे अधिकारी तिकडे इंग्लंडमधल्या सरकारला भारतात रेल्वे सुरू करू म्हणून पत्र पाठवत होते. विनंती करत होते; पण इंग्रजांना भारतातल्या रेल्वेवर खर्च करणं मान्य नव्हतं आणि दुसऱ्या देशात एखादी सुविधा करून द्यायला कोट्यवधी रुपये कोण खर्च करणार? पण इथले इंग्रजी अधिकारी खमके होते. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची.
त्या काळात म्हणजे १८५३ मध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा अधिकारी होता. त्याने इंग्रज सरकारला पत्र पाठवून भारतात रेल्वे का महत्त्वाची आहे, ते मोठ्या हुशारीने कळवलं. तो लिहितो, इंग्लंडला अत्यंत आवश्यक असणारा कापसासारखा कच्चा माल भारतात मुबलक आहे; पण तो निर्यातीसाठी बंदरापर्यंत वेगाने आणता येत नाही. त्यासोबतच इंग्लंडच्या पक्क्या मालाला भारतात खूप मोठी बाजारपेठ आहे; पण माल भारतात पोहोचवायला वाहतूक साधन उपब्लध नाही. रेल्वेमुळे या अडचणी दूर होतील. शिवाय, राजकीय आणि लष्करी कारणासाठीही रेल्वेची आवश्यकता आहे.