

toxic cough syrup deaths India
esakal
डॉ. अनिल न. मडके
खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी २३ बालकांचा मृत्यू झाला. नफेखोरीसाठी या औषधामध्ये तुलनेने स्वस्त, पण औद्योगिक वापराचे रसायन वापरल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या निमित्ताने औषध भेसळीचा मुद्दा चर्चेत आला असून, या भेसळींना अंकुश लावणारी आणि कायद्यांची कडक अंमलबजावणी करणारी यंत्रणा तयार होणे गरजेचे आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सात ऑक्टोबरपर्यंत ‘कोल्ड्रिफ’ या खोकल्याच्या औषधामुळे (कफसिरप) मध्य प्रदेशमध्ये २० आणि राजस्थानमध्ये तीन अशी एक ते पाच वर्षे वयोगटातील एकूण २३ मुले दगावली आहेत. याशिवाय काही मुले व्हेंटिलेटरवर होते, तर काही जणांची मूत्रपिंडे निकामी झाली होती. राजस्थान, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ आणि आता महाराष्ट्रातही या खोकल्याच्या औषधाची विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.