
विकेंद्रीकरण केल्यानंतर यंत्रणा व व्यवस्थेचा मानवी चेहरा समोर यायला हवा व तो अधिक सुशासनाकडे नेणारा हवा. अशी मानवी चेहरा असलेली विकेंद्रित रचना सर्वसामान्यांसाठी अधिक सुखद म्हणावी लागेल.
गे ल्या पंधरा दिवसात आपल्या राज्यातील परिवहन महामंडळाच्या संबंधित एक नवीन धोरण सांगण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाचे पाच विभागांमध्ये विकेंद्रीकरण करून त्या प्रत्येक छोट्या व्यवस्थेला जवळपास सर्व निर्णय घेण्याचे अधिकार व स्वायत्तता देण्यासंबंधीचे हे नवे धोरण सरकारने ठरवले. आणखी एक वृत्त होते ते पुण्यातील. पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून नागरिकांच्या तक्रारीला फारसा प्रतिसाद मिळत नाही आणि त्यामुळे जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात जाण्याऐवजी अनेक नागरिक हे थेट महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातच तक्रारींची दाद मागण्यासाठी जातात. क्षेत्रीय कार्यालये मग कशासाठी? आणखी एक चर्चेतील विषय म्हणजे एक मोठे धरण की अनेक छोटी धरणे; की नदीचे खोरे विकासाचे केंद्र धरून केलेले पाण्याचे विकेंद्रित व्यवस्थापन? या तीनही विषयांतील सूत्र एकच. ते म्हणजे विकेंद्रीकरणाचे तत्त्व.