
कर देतो तसे आपण मत देतो. दोन्ही गोष्टींत आपण उद्याचा काय आजचाही विचार करीत नाही. कर देताना बदल्यात काय मिळतं हे आपण तपासत नाही. मत देताना आपल्याला काय हवंय हाच विचार करतोय. देशाला काय हवंय? राज्याची काय गरज आहे? शहर कसं पाहिजे? गावात काय बदल पाहिजेत? हा विचार करतोय का? किती लोक करतात? आपली हिशेबाची सवय किराणा दुकान, आपला ईएमआय, आपल्या सोसायटीचा मेंटेनन्स यापलीकडे गेली पाहिजे.
दिवस सुरू होतो तसे आपण काहीतरी मिळवायचा प्रवास सुरू करतो. सूर्याकडून आशीर्वाद. ऊर्जा. प्रकाश. सोशल मीडियावर येणारे सुविचार. प्रेरणा. आरती. पूजा. देवाचा प्रसाद आणि आशीर्वाद. मोठ्यांचा आशीर्वाद. दिवसभर हे चक्र चालूच राहतं. बस किंवा ट्रेनमध्ये जागा मिळवणे, तिकीट मिळवणे, कॅब मिळवणे, मीटिंगची वेळ मिळवणे, बॉसची शाबासकी मिळवणे, बॉसने आपल्या पांचट विनोदावर दाद मिळवणे, क्लार्कने कामातून सुटका मिळवणे, कंडक्टरने सुटेपैसे मिळवणे, बाईकवाल्याला ग्रीन सिग्नल आणि कारवाल्याला पार्किंग मिळवणे. हे सगळं आपण मिळवत राहतो. रात्र होईपर्यंत. झोप मिळवेपर्यंत. आणि झोप लागल्यावर आपल्याला विचारही येत नाही की, आपण देतोय काय?