
पुण्यात ‘प्रभात’चे सुंदर घर नांदत्या गाजत्या गोकुळासारखं होते. व्ही. शांताराम मुंबईला निघून गेले आणि दामले मामांनी अंथरूण धरलं अन् प्रभात भंगल्यासारखं झालं. तरीही जिद्दीनं काम सुरू होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर कच्च्या फिल्मच्या आयातीवर निर्बंध आले. शिवाय तत्कालीन ब्रिटिश सरकारनं युद्धाची पार्श्वभूमी विशद करणारा आणि दोस्त राष्ट्रांच्या धोरणाला महत्त्व देणारा एक तरी चित्रपट काढायला हवा, असा नियम केला. त्याप्रमाणे ‘प्रभात’ने पुढचा चित्रपट हिंदीत काढायचा ठरवला. १९४४च्या वर्षअखेर ‘प्रभात’चा ‘चाँद’ हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत बऱ्याच अप्रिय गोष्टी घडल्या.
हिंदीत प्रथमच पदार्पण करणारी बेगमपारा, नृत्यांगना सितारादेवी, हिंदीतला रुबाबदार नायक प्रेम अदीब आणि विख्यात संगीतकार जोडी हुस्नलाल भगतराम यांचे पदार्पण ही आकर्षणं होती; पण चित्रपट ‘प्रभात’च्या परंपरेत बसणारा नव्हता याची सल होती. प्रेम अदीब यांची अनियमित हजेरी, बेछूट वागणं प्रभातकारांच्या मनाला क्लेश देणारं होतं. चाँदचे संगीत मात्र लोकप्रिय ठरलं होतं. दो दिलोंको ये दुन्या मिलनेही नही देती’ हे गाणं मंगलकार्यात औचित्य भंग करणारे असूनही जोरदारपणे वाजलं.