
दिलीप ठाकूर
देव आनंदचा ‘सेन्सॉर’ (२००१) चित्रपट होता, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. तो निर्माण करण्याची वेळ रुपेरी पडद्यावरील दिलखुलास सदाबहार देव आनंदवर का आली, हे मात्र रंजक आहे. दुर्लक्षित चित्रपट कितीही वर्षे झाली तरी लक्ष वेधून घेत नाही, मग तो देव आनंदचा चित्रपट का असेना...
‘प्रेम पुजारी’पासून देव आनंद दिग्दर्शनात उतरले आणि गडबड सुरू झाली. त्यांचे व हिंदी चित्रपटांचे चाहते त्याच्या जुन्या काळातील चित्रपटांकडे पाहू लागले. दिग्दर्शन ही देव आनंद यांची हौस. ‘हरे राम हरे कृष्ण’ (१९७२)मध्ये त्यांना ते जमले, पेलवले. हिप्पी संस्कृतीवरचा त्यांचा हा चित्रपट मनोरंजक होता. जमलाही होता. ‘हीरा पन्ना’ (१९७३) पासून त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात अभिनेत्रीच्या अभिनयापेक्षा तिच्या शरीरसौंदर्याचे दर्शन जास्त महत्त्वाचे वाटू लागले. आपण स्वतः फोटोग्राफर साकारताना तोच फोटोग्राफर झीनत अमानला बिकीनीत फोटो पोझचा आग्रह धरतो आणि तीदेखील किंचित किंचित आढेवेढे घेतल्यावर तयार होते. मैं तस्वीर उतारता हूँ... दिग्दर्शक देव आनंदचे हे रूप नवे होते. त्यांच्या ‘देस परदेस’ (१९७८) विषय चांगला होता. लंडनला नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांच्या समस्या हे त्याचे सूत्र होते.