

Indian politics leadership
esakal
महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याआधीच मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे नेते या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे राजकारण, प्रशासन आणि अर्थकारणावर मजबूत पकड सिद्ध करून दिल्लीला त्यांची आवर्जून दखल घेण्यास भाग पाडले आहे.
देशाच्या राजकारणाला बारा-तेरा वर्षांपूर्वी ‘गुजरात मॉडेल’ने मोहिनी घातली होती. तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने साधलेल्या चौफेर आणि नेत्रदीपक विकासाची देशभरात वेगवान पुनरावृत्ती होईल, असा विश्वास देशवासीयांना वाटत होता. परिणामी, गुजरात मॉडेलचे प्रवर्तक आणि कर्मठ प्रशासक अशी प्रतिमा असलेले नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचून ते देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’मुळे देशाचा किती विकास झाला, यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या समर्थकांमध्ये पराकोटीची मतभिन्नता आहे. पण २०१४ मध्ये मोदींच्या राष्ट्रीय उदयानंतर भारताचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण पार ढवळून निघाले, यात शंका नाही. आता केंद्रातील सत्तेच्या एका तपानंतर ‘मोदींनंतर कोण?’ या प्रश्नावर मोदींनी वयाची पंच्याहत्तरी गाठण्यापूर्वी दबल्या आवाजात आणि पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर बरीचशी उघडपणे चर्चा सुरु झाली आहे.