
डॉ. राधिका टिपरे
दिहिंग पटकाईच्या या घनदाट जंगलाला भारतातलं ॲमेझॉन असं म्हटलं जातं. आसाममधल्या दिब्रुगढ, तिनसुकिया आणि चराईदेव या जिल्ह्यांमध्ये पसरलेलं हे पर्जन्यवन जवळपास सहाशे चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं आहे. या जंगलात आढळून येणाऱ्या व्हाइट विंग्ड वुड डक या विशिष्ट प्रजातीच्या बदकांमुळे या जंगलाचं जागतिक स्तरावरचं महत्त्व लक्षात आलं आणि मग या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.
आसाम राज्याच्या उत्तरपूर्व टोकाकडचं हे घनदाट जंगल पाहायला जाण्याचा विचारही नव्हता मनात. अचानकच प्लॅन ठरला. अरुणाचल प्रदेशातील वॉलाँग या अतिपूर्वेकडील भागात पक्षी पाहण्यासाठी म्हणून जायचं ठरलं. त्यानिमित्तानं अनपेक्षितपणेच आसामला जाण्याचा योग आला. विमानानं दिब्रुगढपर्यंत जायचं होतं. तिनसुकिया गावातही मुक्काम करायचा होता. तिथून दोनच तासांच्या अंतरावर असणारं दिहिंग पटकाई जंगल पाहायचं ठरवलं. सोबत असणाऱ्या एकीला जंगल पाहण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे एकटीनंच जाण्याचा निर्णय घेतला.