

लग्नानंतर डिंपल कपाडिया ‘डिंपल राजेश खन्ना’ झाली तेव्हा ‘बाॅबी’च्या क्लायमॅक्सचे चित्रीकरण शिल्लक होते. लग्नानंतर वांद्र्यातील कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्यात संसारात रमायचे म्हणून प्रयाग राज दिग्दर्शित ‘पाप और पुण्य’ व ‘इन्सानियत’ या दोन्ही चित्रपटांतील भूमिका तिने सोडल्या. दोन्हीत शशी कपूर नायक होता. मनमोहन देसाई यांनीही ‘रोटी’ चित्रपटासाठी राजेश खन्नाची नायिका म्हणून डिंपलचाच विचार केला होता. तात्पर्य, ‘बाॅबी’ या एकमेव चित्रपटानंतर डिंपलने चित्रपटात काम करणे थांबवले.
राजेश खन्नाची पत्नी म्हणून यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’ (१९७३)च्या प्रीमियरला ये आणि पतीच्याच ‘आशीर्वाद फिल्म’च्या कमाल अमरोही दिग्दर्शित ‘मजनून’च्या मुहूर्ताला पाहुण्यांचे स्वागत कर अशा अनेक गोष्टींत डिंपलचे असणे, दिसणे, वावरणे सुरू होते. आपल्या पतीसोबत पत्नीने असे वावरणे ही आपली संस्कृती.