
वाऱ्याचा जोरदार झोत यावा,
आणि रानातला पालापाचोळा रानभर
उधळून, विस्कटून जावा.
आणि शुष्क रेतकण, मृद् गंधकण एकत्र
एकमेकांत गुंफत, स्वचे वेगळेपण विसरून
एकाकार व्हावेत. उडणाऱ्या सर्पासारखे
फुस्स फुस्स करत अदृश्य वाराच व्हावे.
वारीयाच्या लहरीचे, झोताचे रूपांतर
आक्रस्ताळी वावटळीत व्हावे, आणि साऱ्या
रानाला गदगद हलवून सोडावे.
तसे अतीतातल्या स्मरणांचे सुखद, दुःखद,
कटू आठवणींचे झोत बाबांवर आदळले.
अतीतातल्या आठवणींचे, अनुभूतीचे कण.
काही रेतकण, मृद् गंधकण चहूकडे
विखुरले गेले, बाबांचे मन काही सुखद
आठवणींने आनंदित व्हायचे, तर काही
मृद् गंधाच्या आठवणीचे क्षण मृदु व्हायचे.
तर काही सर्पदंशासारखे क्षण, बाबा सहन
करण्याचा प्रयत्न करत होते.