

Bachchu Kadu
esakal
आमच्या लग्नात दारात बँड-बाजा नव्हता; पण दिव्यांगांसाठी तीनशे सायकली होत्या. पंगत नव्हती; पण ज्यांना चालता-बोलता येत नव्हतं त्यांच्यासाठी कृत्रिम हात-पाय होते... तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात पवित्र सोहळा ठरला. कारण तिथे श्रीमंतीची झगमग नव्हती; पण दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य होतं. ते हास्य आजही माझ्या डोळ्यांसमोर ताजं आहे.
मित्रहो, माझ्या जीवनाचा पाया कुठे आहे, तर तो दिव्यांग, मनोरुग्ण आणि वयोवृद्ध बांधवांच्या सेवाश्रुषेत... माझी आई नेहमी सांगायची - ‘ज्यांना कोणी नाही, त्यांच्यासाठी तू उभा राहा.’ आईच्या या बोलण्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला. बालपणीपासूनच आमच्या गावात मी व माझे मित्र ज्येष्ठ व्यक्तींच्या आंघोळीचे, केशकर्तनाचे, छोट्या-मोठ्या प्रथमोपचाराचे कार्यक्रम घेत असायचो. त्या वेळी माझ्या दोन-तीन मित्रांना पोलिओ झाला होता. ते लंगडत चालायचे. कुणाचा पाय वाकडा, कुणाचा हात वाकडा... त्यांचं हलाखीचं आयुष्य पाहून माझ्या मनात फार बेचैनी यायची. ‘आपण यांच्यासाठी काहीतरी करायला हवं,’ असा विचार मनावर कायमचा ठसला.