

Prabalgad Fort
esakal
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रबळगडाला प्राचीन वारसा आहे. माची, बालेकिल्ला आणि कलावंतीन कडा ही या गडाची वैशिष्ट्ये. किल्ल्याचे महाबलाढ्य रूप पाहून राजांनी त्याला ‘प्रबळगड’ असे नाव दिले. स्वराज्यवृद्धीमध्ये या गडाचा मोठा वाटा आहे. प्रबळगड हा राजांच्या स्त्रीसन्मानाचा महत्त्वाचा साक्षीदारही आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. काही किल्ले बांधले; तर काही किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. गडकिल्ले हे मध्ययुगीन काळातील सत्ताकेंद्र होते. ते राजाचे बलस्थान होते. त्यामुळे शिवाजीराजांनी अनेक दुर्गम किल्ले जिंकले. त्यांपैकी रायगड जिल्ह्यातील प्रबळगड हा अत्यंत महत्त्वपूर्ण महाबलवान किल्ला त्यांनी जिंकून घेतला. शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून शिवाजी महाराजांनी भूमिपुत्रांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले; परंतु याचा पाया शहाजीराजे आणि जिजाऊंनी घातला.