
नागपूरचे डॉक्टर जितेंद्र आणि डॉक्टर नम्रता यांच्या पोटी दिव्याचा जन्म ९ डिसेंबर २००५ला झाला. वयाच्या पाचव्या वर्षापासून दिव्या बुद्धिबळाकडे आकृष्ट झाली. दिव्याला स्पर्धांना घेऊन जाण्यासाठी दिव्याच्या आईने आपली कारकीर्द बाजूला सारली. सर्वांत पहिले मोठे यश तिला मिळाले ते ७ वर्षांखालील मुलींचे राष्ट्रीय अजिंक्यपद. त्या पाठोपाठ दिव्याने जागतिक १० वर्षांखालील आणि १२ वर्षांखालील मुलींचे अजिंक्यपद पटकावून येणाऱ्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवली. २०२१मध्ये महिला ग्रँडमास्टरचा किताब व दोन वर्षातच खुला आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताब दिव्याने लीलया मिळवला. २०२२मध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद तर तिने मिळवलेच, पण त्याहून महत्त्वाचे ठरले ते त्या वर्षी भारताच्या संघातून खेळताना मिळालेले ऑनलाइन ऑलिंपियाडमधील सुवर्णपदक! पुढच्याच वर्षी दिव्याने आशियायी अजिंक्यपद मिळवले.
टाटा स्टील या मानाच्या जलदगती स्पर्धेत जगातील मातब्बर खेळाडूंचा समावेश असतो. त्यात दिव्याला शेवटचे मानांकन असूनही दिव्या त्या स्पर्धेत पहिली आली. २०२४चे वर्ष भारतीय बुद्धिबळासाठी ‘सुवर्णाचे वर्ष’ म्हणून ओळखले जाते. या वर्षी बुडापेस्ट येथे झालेल्या ऑलिंपियाडमध्ये भारताच्या दोन्ही, महिला व पुरुष संघांनी, पहिल्यांदाच सुवर्णपदके मिळवली. तब्बल १८१ संघांनी महिला विभागात भाग घेतला होता, त्यामुळे या सुवर्णपदकाचे माहात्म्य वेगळे सांगायला नको! त्यात दिव्याचा वाटा खूपच अमूल्य होता. तिला या कामगिरीबद्दल वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले. हेच वर्ष दिव्यासाठी आणखी खास ठरले, कारण तिने याच वर्षी मुलींचे जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद मिळवले. हे अजिंक्यपद मिळवणारी ती केवळ चौथी भारतीय ठरली.