

DNA Double Helix Structure
Sakal
गेल्या पाऊणशे वर्षांमध्ये जीवशास्त्रामध्ये अनेक शोध लागले आहेत. त्यामध्ये डीएनए रेणूच्या संरचनेचा शोध सर्वात महत्त्वाचा आहे. त्याचे श्रेय जाते तीन शास्त्रज्ञांना - जेम्स वॅटसन (१९२८-२०२५), फ्रान्सिस क्रिक (१९१६-२००४) आणि मॉरिस विल्किन्स (१९१६-२००४). जेम्स वॅटसन यांचे निधन सहा नोव्हेंबर २०२५ रोजी झाल्यामुळे डीएनएच्या ‘डबल हेलिक्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेचा ऐतिहासिक शोध लावणारे शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. यात चौथे नाव रोझालिंड फ्रॅन्कलीनचे घ्यायला पाहिजे. डीएनएची रचना जगापुढे मांडण्यासाठी एक्स-रे क्रिस्टलोग्राफीचे फोटो "निर्णायक" होते. डीएनएचा रेणू स्फटिकरूपात आणणे म्हणजे एक कला होती. ती रोझालिंडने आत्मसात केली आणि डीएनएचा क्रिस्टलोग्राफ काढला होता. दुर्दैवाने रोझालिंडचे सदतिसाव्या वर्षी निधन झाले होते. मरणोत्तर नोबेल पारितोषिक देत नाहीत. पण या शोधाच्या इतिहासात रोझालिंडचे नाव आहेच!