

Pali Language and Dr. Babasaheb Ambedkar
esakal
भारतातील मातीचे रूपांतर दगडात होते. हे दगड भिंती निर्माण करतात. या भिंती म्हणजेच जाती आणि पोटजाती. हे दगड फोडून मातीत रूपांतरित केले जात आहेत. हे काम फुले-शाहू-आंबेडकर करीत आहेत. या मातीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, तालुक्यांत विशेषत: अपरान्तात पाली म्हणून ओळखतात... हे समजून घ्यायचे असेल तर ‘पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा ग्रंथ वाचलाच पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उण्यापुऱ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात असे एकही जीवनक्षेत्र अस्पर्श ठेवले नाही, ज्यात त्यांनी मूलभूत संशोधन केले नाही. मेंदूच्या मशागतीपासून रक्तसंकरासारखी सगळीच क्षेत्रे त्यांनी लीलया पेलली. या सर्व क्षेत्रांतील जाणकारांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला; परंतु बाबासाहेब एक अव्वल दर्जाचे भाषातज्ज्ञ, भाषाकोविद होते आणि बहुभाषिक विद्वान होते. हे क्षेत्र दुर्लक्षित करण्यात आले होते. ही उणीव भरून काढण्याचे कार्य प्रा. विजय मोहिते यांनी आपल्या ‘पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथाद्वारे केले, त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरले आहेत. बाबासाहेबांना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी न्याय दिला, असे म्हणता येणार नाही; परंतु त्यांनी बाबासाहेबांनी पाली भाषेतील केलेल्या कर्तृत्वाला पूर्णतः न्याय दिल्याचे दृगोचर होते.