

Dr. Milind Shinde Personal Experience
esakal
डॉ. मिलिंद शिंदे
एखादी आपत्ती येते आणि सगळं बदलून टाकते, नंतर तटस्थपणे त्या आपत्तीबद्दल सांगताना आपण शक्य तितकं तटस्थपणे सांगायचा प्रयत्न करत असतो मात्र त्यात काहींना नाट्य दिसतं तर काहींना आगाऊपणा वाटतो तर काहींचा हे का सांगितले नाही, असा तक्रारीचा सूर असतो. घटना एकच असते त्यात भरडले गेलेलो असतो पण ती घटना पाहणाऱ्यांच्या भावना वेगवेगळ्या असतात, त्याबद्दल बोलताना त्यांना काय बोलतोय याचेही भान राहत नाही, वडील गेल्यानंतरच्या दुःखात मिंलिंद शिंदे यांना प्रकर्षाने जाणवलं, वडिलांचे निधन, त्यांनी काम कमी करणं, काही नातेवाइकांनी कोर्टात खेचणं, बरंच काही घडलं, काय ते सांगताहेत स्वतः मिलिंद...
‘‘अरे, काय मजा आली राव... फारच मजा आली. तुझ्या वडिलांच्या, त्या ॲक्सिडेंटच्या एपिसोडची, काय मजा आली. तुला सांगू...
जेव्हा हे तू सदर लिहायला लागला ना त्या दिवसापासून मी माझ्या बायकोला सांगतोय. अगं, हे जे काय स्ट्रगल आणि सिनेमे, मालिकांबद्दल हा लिहितोय ना हे काहीच नाही. त्याला काय नाही मिळालं... बऱ्याच नाटकांतून, सिनेमांतून याला काढलं, हे तर काहीच नाही. तू , याचा बाप गेला ते जर यानं लिहिलं ना, तर अशी मजा येणार ना की बास... मी कधीपासून सांगत होतो हिला... तू विचार ना तिला फोन करून, मी हिला कधीपासून सांगतोय. नटरंग, बाबू बँड बाजा, पारध ते तांबडेबाबा - फिंपडेबाबा हे काहीच नाही. याचा बाप मेला ती जर परिस्थिती यानं लिहिली ना, यार मजा येणार. तुला सांगतो मी होतो ना तिथं. काय डेंजर वातावरण. मी तर ना वाटच पाहत होतो. कधी तुझा बाप मरतो म्हणजे तुझ्या लेखात बरं का! सॉरी डोन्ट टेक इट अदरवाइझ. हिला म्हणालो सुद्धा मी, कधी एकदा याचा बाप मरतो आणि या लेखमालेला ती मजा येते. साला गाडीवरून पडल्यापासून थ्रिलच ना यार. तू तिकडं ऑन दी वे... इकडं तुझे वडील ऑन दी रोड... सॉरी मला जोक नव्हता करायचा बरं का. पण ते घडून गेलं. सॉरी बोलून गेलो आणि मग ते सिव्हिल ते नोबल ते तुझं गाव. आहाऽहाऽहा. काय साला हॅपनिंग...
तरी पण मला अजून वाटतं यार तू अजून रंगवून लिहायला पाहिजे होतं. मी हिला म्हणालो बरं का तरी. जे घडलं त्याच्यापेक्षा कमीच लिहिलं. मी हॅपी नाही या पीस ऑफ रायटिंगवर. कारण घडलेल्या घटनेमध्ये इतकं पोटेन्शियल आहे किंवा होतं, त्या प्रमाणात तू न्याय नाही दिला असं माझं मत आहे. हिला बोललो सुद्धा मी. एखाद्यानं सहज जरी लिहिलं ना तरी एखादा माणूस रडेल. पण मिलिंदनं तो मुलगा असून, त्यातल्या त्यात तो नाटक-सिनेमावाला असून, जरा आणखी ड्रॅमॅटिक लिहायला हवं होतं. मी तर हिला हेसुद्धा म्हणालो हे एवढं आर्टिकल मी लिहायला पाहिजे होतं. मी जरा म्हणजे तुफानच मजा आणली असती... पण असो...
ज्याला मिळतं त्याला लिहिता येत नाही.
आपण जीव जाळून काय होणार आहे?
कसं असतं. ज्याच्या घरात घडतं ना त्याला त्याचं महत्त्व जरा कमीच असतं. तेच झालंय या तुझ्या नॅरेशनमध्ये. मला तेवढा तो विषय लागलाय ना तो बहुतेक तू त्या परिस्थितीचा, घटनेचा भाग असून तुला लागलेला दिसत नाही. ते म्हणतात ना... घर की मुर्गी दाल बराबर. सॉरी हा. जोक केला. पण वरवर हा जोक वाटेल पण डीपिक्ट द रिॲलिटी जरा कमी वाटलं मला तुझं निरीक्षण...