

Rashtriya Swayamsevak Sangh History
esakal
देशाच्या इतिहासात तसेच समाजजीवनात आणि राजकीय क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची सतत चर्चा सुरू असते. या संघटनेच्या विविध क्षेत्रात असलेल्या विविध स्वरूपाच्या शाखा व त्याची कार्यपद्धती याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. आजपर्यंत संघाने यावर उघडपणे ठाम भूमिका घेतलेली नव्हती, संस्था जरी परिवार या संकल्पनेने काम करत असली तरी अधिकृतपणे संघाने या आमच्या संस्था आहेत असे यापूर्वी कधी स्पष्ट केले नव्हते मात्र गेल्या १५ ते २० वर्षात संघाच्या भूमिकेत बराच बदल झाला आहे. संघाने आता अधिकृतपणे बऱ्याच कामामधला आपला सहभाग स्पष्ट केलाय. डॉ. शरद कुटे यांची ही दोन पुस्तके संघाच्या कामाची विस्तृत आणि सूक्ष्म पद्धतीने माहिती देतात. यातले पहिले पुस्तक ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक शतकाची वाटचाल’ हे संघाच्या आजपर्यंतच्या वाटचालीची तपशीलवार माहिती देते. एखाद्या संशोधन ग्रंथाची शिस्त असावी तशी शिस्त पाळून या पुस्तकात संघाच्या विविध संस्थांची व कामाची माहिती यातील ७० प्रकरणांमधून देण्यात आली आहे. २५ सप्टेंबर १९२५ या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, त्यानंतर संघविचाराच्या विविध संस्था निघाल्या मग ती राष्ट्रसेविका समिती असेल, भारतीय जनसंघ असेल किंवा वनवासी कल्याण आश्रम असेल अथवा विश्व हिंदू परिषद असेल या सगळ्या संस्थांची नेमकी स्थापनेची तारीख तसेच त्या संस्थेचे थोडक्यात कार्य इथे डॉ. कुटे देतात. त्यामुळे यासंस्थांची उभारणी, त्याचा उद्देश व त्यासाठी कोण लोक कशापद्धतीने राबले, संघ परिवार या संस्थेचा आज जो वटवृक्षासाऱखा पसारा दिसत आहे व त्याची पाळेमुळे विविध क्षेत्रात कशी पसरली आहेत ते या पुस्तकातील तपशीलवार माहितीने कळते.