

Yedeshwari Devi Yatra Dharashiv
esakal
भारतीय परंपरेत नदीबरोबरच पर्वत आणि डोंगरांनाही स्थान मिळालेले आहे. विविध डोंगररांगांमध्ये पसरलेल्या निसर्गसंपदेचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांना देवादिकांचे स्थान दिल्याचे आढळते. असंख्य गावांमध्ये पाऊस पडू दे, म्हणून डोंगराची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा आणि पावित्र्याचा हाच वारसा येरमाळ्याच्या डोंगराला मिळालेला असावा.
देवी येडाईचे मंदिर असलेल्या येरमाळ्यातील डोंगराला धाग्यांनी विणण्याचा अनोखा विधी केला जातो. सुमारे दोन किमीचा व्यास असलेल्या या डोंगराला भक्त भक्तिभावाने धागा बांधतात. डोंगराभोवती या धाग्याची मोठी सफेद चादर विणली जाण्याचे अनोखे सौंदर्य येथे अनुभवायला मिळते. चैत्राच्या महिन्यात दिवसा सूर्याची आणि पौर्णिमेच्या रात्री चंद्रकिरणांची शुभ्र उधळण होताच, संपूर्ण डोंगर जणू पांढऱ्या रेशमी धाग्यांच्या चादरीने उजळून निघतो. भारतात अशा प्रकारे एखाद्या डोंगराला चोहोबाजूने धाग्याने बांधून त्याचा आदर-सन्मान करणारा विधी क्वचितच आढळून येतो.
धाराशिवपासून २६ आणि तुळजापूरहून सुमारे ३५ मैलांच्या अंतरावर येरमाळा हे येडाई देवीचे ठाणं आहे. तिला येडेश्वरी देवीही म्हणतात. चैत्राच्या पौर्णिमेला येरमाळ्यात येडाईची यात्रा भरते. निसर्गाशी अनोखे संबंध अधोरेखित करणारी तसेच अनेक लोकविधी जपणारी ही यात्रा असते. चैत्र पौणिमेपासून ती सलग पाच दिवस चालते. यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भक्तगण आणि देवीच्या लोकसंस्कृतीचे वारसदार असलेले पोतराज, देवकरीण, आराधिनींसमवेत तृतीयपंथीही मोठ्या संख्येने सहभागी होतात.