
ऋषिराज तायडे
काही कारणास्तव आपला रक्तदाब कमी-जास्त झाला किंवा हृदयाचे ठोके कमी-अधिक झाले, तर ते आपण मोजू शकतो. त्याचप्रकारे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास ते किती झाले हेही आपण तपासू शकतो; परंतु कधी चिंता वा मानसिक दडपण किती वाढले, हे मोजता आले तर... हो आता ई-टॅटूच्या माध्यमातून इतर आजारांप्रमाणे मानसिक ओझेदेखील मोजता येणार आहे.
दैनंदिन आयुष्यात काही ना काही कारणास्तव, प्रत्येकाला मानसिक दडपण, चिंता वा मानसिक ओझे सहन करावे लागते. कोणाला अभ्यासाचं दडपण, कोणाला पैशाची चिंता, कोणाला कौटुंबिक कलह, तर कोणाला ऑफिसमधील कामाचे टेन्शन. जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या आयुष्यात ही समस्या असतेच. तुमचं टेन्शन किती आणि कशाचे आहे, हे अनेकदा लक्षात येत नाही. अनेकजण तर टेन्शन हे सामान्य गोष्ट आहे, असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतात; परंतु कधीकधी किरकोळ टेन्शनही मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते.