

Economic Nationalism
esakal
रेल्वेगाडी रूळ बदलताना खडखडाट करते. बदलाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खडखडाटाची ही स्थिती कायम राहते. जगाची घडी बदलत असताना सध्या ज्या उलथापालथी अनुभवायला मिळत आहेत, त्यादेखील अशाच स्थित्यंतराचे निदर्शक आहेत. अशा या काळात सर्वांत महत्त्व आले आहे, ते आर्थिक राष्ट्रवादाला. प्रत्येक देश आपल्या आर्थिक हितसंबंधांना सर्वतोपरी महत्त्व देताना दिसतो आहे. त्यामुळे निर्णय घेतानादेखील प्राधान्य दिले जात आहे, ते या आर्थिक हितसंबंधांना.
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेचा तपशील पाहिला, तर हीच गोष्ट अधोरेखित होते. खरे तर ट्रम्प एरवी जगातील यच्चयावत प्रश्नांवर स्वतःला केंद्रस्थानी ठेवून भाष्य करत असतात. परंतु, चीनच्या अध्यक्षांबरोबर थेट बोलणी करताना त्यांच्या अभिनिवेशाचा स्वर एकदम खालच्या पट्टीत आला होता. याचे एकमेव कारण म्हणजे, व्यापाराची काळजी. चीनकडून अमेरिकेत होणारी आयात, अमेरिकी कंपन्यांना चीनच्या बाजारपेठेत मिळणारी संधी आणि परस्परांचे आयात शुल्क यावरून दोन्ही देशांत गेल्या काही वर्षांत संघर्ष चालू आहे. त्यातून निर्माण झालेले अडथळे दूर करण्यास प्राधान्य देण्याच्या गरजेतून ट्रम्प यांनी हा पवित्रा घेतला हे स्पष्ट आहे. हाच ट्रम्प यांचा आर्थिक व्यवहारवाद. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानात दोन्ही देशांत मोठी स्पर्धा आहे.