

El Nino and La Nina
esakal
‘एल निनो’ म्हणजे दुष्काळ असे समीकरण मांडता येत नाही. ‘एल निनो’ उद्भवण्याची जराशी चाहूल लागली की, लगेच दुष्काळाचा बागुलबुवा उभा करणे तितकेसे वाजवी नाही. कारण हे आहे की, ‘एल निनो’ मॉन्सूनसाठी धोकादायक असला तरी तो मॉन्सूनचा एकमेव नियंत्रक नाही. हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिमालयाच्या पर्वत रांगा आणि संपूर्ण युरोप व आशिया खंड यांचा भारतीय मॉन्सूनच्या निर्मितीत आणि सक्रियतेत सहभाग असतो. हिंद महासागराच्या पश्चिम आणि पूर्व भागांच्या तापमानातील तफावत मॉन्सूनच्या प्रक्रियेत महत्त्वाची असते.
मराठी भाषेने जे अनेक शब्द अन्य भाषांतून आत्मसात केले आहेत त्यांत मॉन्सून हा एक महत्त्वाचा शब्द आहे. त्याचे मूळ मौसिन या अरबी भाषेत असले तरी तो आता मराठीत सर्वांच्या सुपरिचयाचा झाला आहे. मॉन्सून म्हणजे भारतावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा पाऊस अशी त्याची व्याख्या सामान्य जनतेने करून टाकली आहे. प्रत्यक्षात मात्र मॉन्सूनचा पाऊस दोन टप्प्यांत पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा पहिला टप्पा, आणि ऑक्टोबर ते जानेवारी हा दुसरा टप्पा. नैऋत्य मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सून अशी त्यांची दोन नावे आहेत. कारण मॉन्सूनचे वारे आधी नैऋत्येकडून आणि नंतर ईशान्येकडून वाहत येतात. पण ईशान्य मॉन्सूनचा पाऊस दक्षिण भारतापुरता मर्यादित असतो. महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो तो फक्त नैऋत्य मॉन्सूनचा. दर वर्षी मॉन्सून महाराष्ट्रात १० जूनच्या सुमारास दाखल होतो आणि १० ऑक्टोबरच्या सुमारास तो परतू लागतो हे वेळापत्रक आता महाराष्ट्रातील शाळकरी मुलांपासून शेतकरी बंधुभगिनींपर्यंत सर्व जनतेच्या ओळखीचे झाले आहे.
अलीकडच्या काळात जे दोन नवीन शब्द मराठी भाषेत रोजच्या उपयोगात आले आहेत ते म्हणजे ‘एल निनो’ आणि ‘ला निना’. ते इंग्रजी नसून मुळात स्पॅनिश भाषेतले आहेत. हवामानशास्त्रज्ञ मॉन्सूनच्या संदर्भात हे शब्द वापरतात आणि ते जसेच्या तसे मराठी वृत्तपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांवरही घेतले जातात. तरीही मॉन्सून शब्दाला जसे आता मराठीत एक अर्थपूर्ण स्थान आहे तसे ते ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या शब्दांना अजून लाभलेले नाही. सर्वसामान्यांसाठी ते कुतूहलाचे विषय आहेत. काहीसे गहन, थोडेसे भीतिदायक असे ते शब्द आहेत. ‘ला निना’ वर्ष संपले आहे किंवा ‘एल निनो’ प्रबळ होत आहे, असे जेव्हा शास्त्रज्ञ बोलू लागतात तेव्हा चांगले होणार की वाईट, हे लगेच समजत नाही.