

Emotional Management
esakal
डॉ. संजय वाटवे - saptrang@esakal.com
आपलं जीवन सुखी, समाधानी, समृद्ध करणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले नातेसंबंध! काही नाती जन्माने मिळतात, काही आपण निर्माण करतो. ही सगळी नाती आपल्याला आधार, स्थिरता, समाधान देत असतात. पण, सगळी नाती घडवावी, जोपासावीही लागतात. त्यासाठी काही नीतिनियम पाळावे लागतात. स्वतःला मुरड घालावी लागते. दुसऱ्याच्या मनाचा, विचारांचा, आवडी-निवडींचा आदर ठेवावा लागतो. तसं झालं नाही तर नातं खऱ्या अर्थाने फुलत नाही. हुकुमशाहीचं, जुलमी नातं लवकरच कोमेजतं आणि अवेळी संपुष्टात येतं. असं एकतर्फी नातं कोणाच्याच व्यक्तिमत्त्वाला नवी उभारी देऊ शकत नाही. ह्या सगळ्यांच्या मुळापर्यंत जाऊन कारणे व उपाय शोधणं हे सगळं करावं लागेल.
हे मंथन सगळ्यांनी मिळून करायचं आहे. हे फक्त मानसशास्त्रज्ञाचं काम नाही. कायदा, रक्षक, सरकार, राजकारणी, मुलांना घडवणारी शाळा-महाविद्यालये, त्यांचे विचार जाणून घेणारे समुपदेशक आणि विचारवंत ह्या सगळ्यांनी मिळून हा अभ्यास करायचा आहे. विशेषतः ह्या मंथनातून बाहेर येणारे निष्कर्ष पालकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि त्यावरच्या उपाययोजना अंमलात आणायच्या आहेत. नुसते निष्कर्ष किंवा ज्ञान पुरेसे नसते. दिल्लीची ‘निर्भया’ केस देशभर गाजली, चर्चिली गेली. पण तशा केसेस कमी झाल्या की वाढल्या? कुठेतरी नकळतपणे असा संदेश जातो आहे की, गुन्हे रोखण्यासाठी सध्याची कायदायंत्रणा, पोलिस यंत्रणा, सरकार हे ‘प्रतिबंधक’ (डीटेरन्ट) म्हणून सक्षमपणे कार्यरत नाही. कोणालाच गुन्हा करताना कायद्याची भीती वाटत नाही. कोणी आपलं काही वाकडं करू शकणार नाही. हा ‘आत्मविश्वास’ कुठून येतो. पूर्वी झालेल्या गुन्ह्यांना शिक्षा न झाल्यामुळे. मुंबईच्या पाच वर्षांपासून गाजत असलेल्या गँगरेप मर्डरच्या केसची अजूनही ‘एफआयआर’ नाही. दीड वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात दाखल झालेली ही केस गटांगळ्या खाताना दिसते. अशा अनेक केसमध्ये जगाला माहीत असलेले गुन्हेगार समाजात राजरोसपणे वावरताना दिसतात. मग काय, चार वर्षांच्या चिमुकलीवर रेप करा किंवा अडचण वाटणारा एखादा माणूस ८-१० तास मारहाण करून मारून टाका नाही, तर नकोसा असलेला नवरा दरीत ढकला...!
सध्याच्या जीवनात कोणीच कोणत्याही नात्याबाबत ‘सिरियस’ नाही. मग ते नातं पाल्य-पालकांचं असो, पती-पत्नीचं असो, मैत्रीचं असो. कुठलंच नातं फारसं महत्त्वाचा वाटत नसल्यामुळे ते जोपासण्यासाठी जी मशागत करावी लागते ती कुणालाच करायची नाही. नाती राहिली काय, नाही राहिली काय. फक्त ‘मी’, ‘मी’ आणि ‘मी’. ह्या ‘मी’ला इतकं महत्त्व आलंय की, त्यापुढे सगळं किरकोळ आहे. सोशल मीडियामधली बेगडी, भ्रामक नाती बनावट असूनही महत्त्वाची मानली जातात.