विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालाय, हे पचवणे अजूनही अवघड जातेय. सौरव गांगुलीनंतर परदेशात जाऊन यजमान संघांना कोण भिडला असले तर तो विराट... जोहान्सबर्ग, एडबेस्टन, मेलबर्न, सिडनी, श्रीलंका, वेस्ट इंडिज येथे जाऊन विराटने कसोटी क्रिकेट काय असतं आणि ते कसं खेळायचं असतं हे दाखवून दिले. नेहमी सर्वोत्तम देण्याचा अट्टाहास त्याला यशोशिखरावर घेऊन गेला. दिल्लीचा रांगडेपणा त्यात स्पष्ट दिसायचा, ऑस्ट्रेलियात जाऊन ऑसी खेळाडूंविरुद्ध स्लेजिंग करणारा तोच... विराटमुळे भारतीय कसोटी क्रिकेटचं पुनरुज्जीवन झालं, असे तज्ज्ञ म्हणतात. ते खरंही आहेच. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आज युवा खेळाडूंना त्याच्या मार्गदर्शनाची गरज असताना तोही क्रिकेटच्या खऱ्या फॉरमॅटमधून निवृत्त झाला.आता टीम इंडियासाठीचा पुढील काळ हा खरा 'कसोटी' चा असेल...