

Ashes Series 2025
esakal
गेल्या १४ वर्षांत इंग्लंड संघाला दौऱ्यावर गेल्यावर ॲशेस मालिका जिंकता आलेली नाही. ऑस्ट्रेलियात एक तरी कसोटी सामना जिंकणे गेल्या तीन दौऱ्यांत जमलेले नाही. चालू मालिकेचा प्रवास त्याच दिशेने चालू असल्याची भावना इंग्लंड क्रिकेटला सतावत आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत २९ ऑगस्ट १८८२ रोजी इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरील भयानक पराभवानंतर स्पोर्टिंग टाइम्समध्ये इंग्रजी पत्रकार रेजिनाल्ड शर्ली ब्रूक्स यांनी एक शोकांतिका प्रकाशित केली. त्यांच्या लेखाच्या सुरुवातीचे शब्द होते, ‘इंग्लिश क्रिकेट मृतावस्थेत होते आणि मृतदेहाचे दहन केले जाईल आणि राख ऑस्ट्रेलियाला नेली जाईल’. ब्रूक्स यांनी मांडलेली ही गोष्ट इंग्लंड संघाला चांगलीच झोंबली. कप्तान इव्हो ब्लाय यांनी गर्जना केली की मी इंग्लंड संघाचा मान परत मिळवेन. जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया परत एकमेकांना भिडले तेव्हा इंग्लंडचा कप्तान इव्हो ब्लाय यांनी मालिका तर जिंकून दाखवलीच, वर त्याने मागील पराभवानंतर झालेल्या अपमानाचा बदला घ्यायला स्टंपवरची एक बेल जाळून त्याची राख एका छान छोट्या टेराकोटाच्या बनवलेल्या कपात भरली आणि त्यालाच ॲशेस नाव पडले. हा इतिहास कदाचित बऱ्याच क्रिकेट रसिकांना माहीत असेल. क्रिकेट इतिहासातील सर्वात नावाजलेल्या कसोटी मालिकेची दुर्गती अशी झाली आहे, की १४० वर्षांनंतर ‘इंग्लिश क्रिकेट मृतावस्थेत होते आणि मृतदेहाचे दहन केले जाईल आणि राख ऑस्ट्रेलियाला नेली जाईल,’ असे ब्रूक्स यांनी स्पोर्टिंग टाइम्समध्ये लिहिलेले शब्द परत एकदा तरंगत वर येताना दिसत आहेत, इतका पहिल्या दोन कसोटी सामन्यांत इंग्लंड संघाचा खेळ निराशाजनक झाला आहे.