Cancer vaccine
Esakal
डॉ. नानासाहेब थोरात
sakal.avtaran@gmail.com
‘लस म्हणजे भविष्यातील होणाऱ्या आजारावरील वर्तमानातील उपचार असतो,’ तर वर्तमानातील आजारांवर औषध हाच उपाय असतो. कॅन्सरच्या लसीबाबतीत एकदम उलट आहे. कॅन्सरची लस म्हणजे वर्तमानातील आजारांवर भविष्यातील औषध आहे. दोन आठवड्यांपासून भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये रशियन कॅन्सर लसीबद्दल खूप चर्चा चालू आहे.
रशियातील व्लादिवोस्तोक शहरात ३ ते ६ सप्टेंबरदरम्यान १०वी पूर्व आर्थिक मंच आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ७५ देशांतील आठ हजार ४०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यामध्येच रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीच्या प्रमुख डॉ. वेरोनिका स्कवोर्त्सोवा यांनी आम्ही कॅन्सर लस शोधली असून, लवकरच ती रुग्णांना दिली जाईल, असा दावा केला.
या लसीला ‘एन्टरोमिक्स’ हे नाव दिले आहे. डॉ. वेरोनिका यांच्या दाव्यानुसार लस वारंवार दिल्यानंतर ती सुरक्षित ठरली असून, तिचा प्रभावी परिणामही दिसून आला आहे. काही रुग्णांमध्ये कॅन्सर ट्यूमरची वाढ ६०-८०%ने कमी झाली. ही लस प्रथमतः कोलोरेक्टल कॅन्सरविरुद्ध वापरली जाणार आहे (मोठ्या आतड्यांचा कॅन्सर). हा आजार जगभरातील सर्वात सामान्य आणि घातक कर्करोगांपैकी एक मानला जातो. रशियाने असाच दावा गेल्या वर्षीसुद्धा केला होता.