
बोलपटाची वीस वर्षे होऊन गेली होती; पण स्वातंत्र्यानंतर चित्रनिर्मितीस बहर आला होता. नव्या तंत्राशी, मायावी माध्यमाशी जवळीक करणाऱ्यांना मात्र यशस्वितेची कळ काही नक्की सापडत नव्हती. नित्य नव्या कथा शोधल्या जात होत्या, नवे चेहरे शोधले जात होते; पण लोकप्रियता, यश, संपत्तीची माळ गळ्यात पडेलच, याची शाश्वती नव्हती. एकत्र कुटुंबासारखं, गोकुळासारखं नांदणारं प्रभात फिल्म कंपनीचं अस्तित्वच संपलं. ‘बॉम्बे टॉकीज’ही पाठोपाठ इतिहासजमा झाले; पण जनमानसावर एकावेळी वीस संगीतकार मात्र राज्य करीत होते. बहार आयी, खिली कलियाँ, हँसे तारे चले आओ...
‘श्री गुरुदेव दत्त’ या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली तीच काहीशा नैराश्याच्या सावटात. विख्यात लेखक गो. नी. दांडेकर यांची कथा होती. दिग्दर्शक रा. वि. राणे. संगीत स्नेहल भाटकर यांचे, तर मुख्य भूमिकेत युवा नट विवेक होते; पण दुर्दैवाच्या दशावताराला जणू सुरुवात झाली होती. चित्रपट प्रदर्शित झाला खरा; पण प्रेक्षकांनी त्याची दखल घेतली नाही. थोडक्याच दिवसांत म्हणजे १० ऑक्टोबर १९५३ या दिवशी प्रभात कंपनीचा कारभार गुंडाळावा, असा कोर्टानं आदेश दिला. पुढील कारवाईस सुरुवात झाली.