
ब्लॅक विडो स्पायडर हा एक असा जीव जो प्रजननाच्या नावाखाली आपल्या जोडीदाराचे आयुष्य संपवतो. हा कोळी विज्ञानात जितका चर्चेचा विषय आहे, तितकाच तो लोककथांमध्ये गूढतेचे प्रतीकही आहे. ही मादी कोळी सौंदर्यवान आहे; पण घातकसुद्धा आहे. ती प्रजनन करते; पण त्याच वेळी नाशही करते. तिचे वर्तन आपल्याला दाखवून देते, की प्रेम आणि पोषण यांच्यातली सीमारेषा निसर्गात कधी कधी पुसट होते. अशा कोळ्यांचे जीवनशास्त्र केवळ भयावह नाही; तर उत्क्रांतीतील त्याग, निवड आणि टिकण्याची जिद्द यांची गोष्ट सांगते.
जो सजीव जन्माला येणार तो कधीतरी गतप्राण होणारच. अमरत्व घेऊन आलेला कुठलाही सजीव आपल्याकडे अस्तित्वात नाही. असेल तर त्याची फारशी कुणाला कल्पना नाही. निसर्गात गोष्टी निर्माण होतात आणि नष्टही होतात. हे एक चक्र आहे. असे असले तरी हा नियम मात्र नक्कीच नाही. कारण उत्क्रांतीच्या तत्त्वात जन्म आणि मृत्यू हे जरी काळाचे चक्र असले तरी प्रत्येक पिढीनंतर येणाऱ्या पुढच्या पिढीत कुठले ना कुठले बदल पाहायला मिळतातच. कधी हे बदल शारीरिक पातळीवरील असतात, कधी मानसिक; तर कधी सामाजिक असतात. त्यातही माणूस तर सतत उत्क्रांत होत गेला आहे.