

Screen time
esakal
‘युनेस्को’च्या एका अहवालानुसार सत्तरहून अधिक देशांनी शाळांमध्ये फोनवर प्रतिबंध किंवा मर्यादा आणल्या आहेत. वर्गात मोबाईल फोन नसल्यास विद्यार्थी अधिक लक्षपूर्वक बसतात, शिक्षकांचे बोलणे अधिक प्रभावी ठरते आणि मित्रांमधील संवाद वाढतो, असे अनुभव जगभरातील अनेक शिक्षक सांगतात. विद्यार्थ्यांचा फोनशिवायचा दिवस अधिक शांत, कलात्मक आणि उत्पादनक्षम असतो. तंत्रज्ञानाची भूमिका शिक्षणात निश्चित आहे, पण ‘सतत हातात फोन’ गरजेचा नक्कीच नाही, हा निष्कर्ष आता सार्वत्रिक बनू लागला आहे. यामध्ये भारतातील स्थिती काय आहे, याचा ऊहापोह...
फेब्रुवारी १९९३ मध्ये अमेरिकेत निन्टेंडो गेम्सची लोकप्रियता पाहून मी ‘रविवार सकाळ’मध्ये एक लेख लिहिला होता. त्या काळात हे खेळ भारतात आलेही नव्हते, पण मुलांना स्क्रीनकडे ओढणारी ही लाट आपल्या समाजापर्यंत पोहोचणार हे स्पष्ट दिसत होते. निन्टेंडो हा केवळ एक खेळ नव्हता; तो बदलणाऱ्या काळाचा संकेत होता. त्या वेळी हा इशारा लहान वाटला असेल, पण तीन दशकांनी तोच धागा डिजिटल जीवनाच्या विस्तीर्ण जाळ्यात बदलला. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या न्यूयॉर्क टाइम्समधील लेखाने एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. तंत्रज्ञानाबद्दल सुरुवातीला निर्माण होणारा ‘उत्साहाचा फुगा’ आता चिंता आणि काळजी मध्ये रूपांतरित होत आहे. गेल्या तीस वर्षांत स्क्रीनची शक्ती प्रचंड वाढली. स्मार्टफोन, सोशल मीडिया, यूट्यूब, रील्स, वेगवान गेमिंग आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्वांनी मुलांच्या खेळण्याच्या, शिकण्याच्या आणि नातेसंबंध निर्माण करण्याच्या पद्धतीच बदलून टाकल्या. एकेकाळी फक्त काही मुलांचे लक्ष आकर्षित घेणारे साधन आता संपूर्ण पिढीचे दैनंदिन जग बनले आहे.