
अमोघ वैद्य
महाराष्ट्रातल्या कार्ले, भाजे, अजिंठा, वेरूळपासून ते बिहारच्या बाराबर लेण्यांपर्यंत; ओडिशातील लेण्यांपासून दक्षिणेतील आदिमानव लेण्यापर्यंत भारतभरातील महत्त्वाच्या लेण्यांचा भूगोल, इतिहास, स्थापत्य, धार्मिक पार्श्वभूमी आणि आजच्या संदर्भांच्या आधारे मागोवा घेणारी नवी मालिका – लयनकथा. इतिहासाचे मूळ स्रोत – पुरातत्त्व खात्याचे दस्तावेज, संशोधनग्रंथ, तज्ज्ञांच्या अभ्यासांच्या आधारासह लेण्यांमधली अद्भुतता मांडण्याचा हा एक प्रयत्न.
“लेण्यांमधून प्रवास करणं म्हणजे इतिहासाच्या हृदयात प्रवेश करणं,” हे वाक्य मी कुठं वाचलं, ऐकलं मला नेमकं आठवत नाही, पण हे वाक्य मनात अगदी घट्ट बसलं. लेण्यांमध्ये फिरणं, लेण्या पाहणं हे आता अनेकांच्या वार्षिक ट्रिप प्लॅनचा अविभाज्य भाग झाला आहे. मग अगदी वेरूळच्या लेण्यांपासून ते पुण्यात अगदी भर ‘गावात’ असणाऱ्या पाताळेश्वर लेण्यापर्यंत कुठली ना कुठली लेणी आपल्याला बोलवतेच.