
निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. जगातील सर्वात समृद्ध व तांत्रिकदृष्ट्या प्रगत अमेरिका आणि युरोप खंडांवरच हवामान संकटाने घाला घातला आहे. उष्णतेच्या लाटा, महापूर, वणवे, दुष्काळ आणि समुद्राची वाढती पातळी हे आकस्मिक अपघात नव्हेत; तर हवामानबदलाच्या संकटाचे ठोस पुरावेच आहेत.
काही आठवड्यांपूर्वी न्यूयॉर्क शहरातील रस्ते एका अभूतपूर्व वादळी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले होते. शहराला विनाशकारी पुराने घेरले होते. काही दशकांतील ही सर्वात भयावह पूरस्थिती होती. सबवे बंद झाले. संपूर्ण वस्त्या स्थलांतरित कराव्या लागल्या. त्याचवेळी वादळामुळे आठ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसानही झाले. ही काही एकमेव घटना म्हणता येणार नाही. याच उन्हाळ्यात कॅलिफोर्नियात २५ लाख एकरहून अधिक जमीन वणव्यांमुळे भस्मसात झाली; तर स्पेन, ग्रीस आणि इटली यांचा समावेश असलेल्या भूमध्य सागरी प्रदेशात जीवघेण्या उष्णतेच्या लाटांनी हाहाकार माजवला. दक्षिण युरोपमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण दिवसांची नोंद याच काळात झाली. येथील तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. एकट्या ग्रीसमधील वणव्यांत ३००हून अधिक लोकांचा बळी गेला आणि लाखो एकर जमीन जळून खाक झाली. विशेष म्हणजे, इटलीतील पो नदीने एक हजार वर्षांतील सर्वात कमी पातळी गाठली. यामुळे देशावरील पाणीसंकट गडद झाल्याचे हे चिन्ह आहे.