
Urban pigeons crisis
esakal
प्राणी-पक्ष्यांचं रक्षण म्हणजे फक्त त्यांना खायला देणं नव्हे; तर त्यांच्या नैसर्गिक जगण्याची परिस्थिती निर्माण करणं. कबुतरांसाठी एकाच सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे मोठ्या प्रमाणात धान्य टाकणं म्हणजे त्यांच्या अन्न शोधण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला मारून टाकणं होय. तुमचा असा दयाभाव निसर्गाच्या दृष्टिकोनातून पाहू गेल्यास कबुतरांसाठी तो दयाळूपणाचा पिंजरा ठरतो...
पृथ्वीतलावर प्रत्येक सजीवाची अन्न शोधण्याची एक पद्धत असते. ती क्रिया त्यांच्या दैनंदिन जगण्याशी जोडलेली असते. शिकार करणं, दाणे टिपणं, कीटक शोधणं, फळं तोडणं वगैरे... एखाद्याला या अन्न शोधण्याच्या संघर्षातून मुक्त केलं; तर त्याचं अलीकडच्या काळात जे मुंबईसारख्या शहरात कबुतरांचं झालं, ते होईल.
प्रत्येक सजीवाचं जीवनचक्र त्याच्या पोटा-पाण्याच्या गरजांभोवती विणलेलं असतं. ज्या ठिकाणी त्याच्या मूलभूत गरजा भागवता येतात, त्यानुसार तो आपला अधिवास शोधत असतो. माणसंही त्यातून सुटलेली नाहीत. तोही रोजगार, धंदा जिथे मिळेल तिथे जातो आणि वास्तव्य करतो. यात कुणालाही फुकटात काहीच मिळत नसतं. त्यासाठीही तो आपलं कौशल्यं, कष्ट, श्रम पणाला लावून आपल्या उदरनिर्वाहासाठी झटत असतो.