

FIFA World Cup Europe
esakal
विश्वचषक फुटबॉल चालू असताना युरोपमध्ये असण्याचा अनुभव वेगळाच आहे. मान्य आहे मला की भारतात तरुणाई फुटबॉल प्रचंड प्रमाणात बघत असते. भारत आणि युरोपीय देशातील फुटबॉल प्रेमातील फरक इतकाच वाटतो, की भारतातील तरुण फुटबॉल बघतात युरोपिअन आणि लॅटिन अमेरिकन देशांतील तरुण आणि तरुणीही नुसता फुटबॉल बघत नाहीत तर ते खेळतात. भारतात प्रत्येक वस्तूच्या जाहिरातीमध्ये जर खेळाचा वापर केला गेला असेल तर त्यात बहुतांशी क्रिकेट आढळते. तसेच युरोप आणि लॅटिन अमेरिकन जाहिरातींमध्ये फुटबॉलचा अंतर्भाव केलेला दिसतो. युरोपातील बऱ्याच घरामागच्या अंगणात छोटे फुटबॉल गोलपोस्ट दिसते आणि अगदी लहान लहान मुले-मुली संपूर्ण फुटबॉलचा पेहराव करून योग्य बूट घालून खेळताना बघायला मिळाले.
यंदाच्या माझ्या दौऱ्यात मजा अशी आली, की मला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य सामने इंग्लंडमध्ये बसून टीव्हीवर बघायला मिळाले आणि स्थानिक चाहत्यांच्या सुख-दु:खाचे हेलकावे अनुभवता आले. उपांत्य फेरीत पहिला गोल इंग्लंडने करून नंतर अर्जेंटिना समोर त्यांना २-१ पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर गर्दी असलेल्या रस्त्यांवरची शांतता बरेच काही सांगून जात होती. आता आज रविवारी रात्री युरोपमधील स्पेन आणि लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिना संघांदरम्यान अंतिम सामना होणार असताना स्पेनचा स्पर्धेतील प्रवास पद्धतशीर तर अर्जेंटिनाचा चमत्कारिक झाला असे वाटत नाही का तुम्हाला?