

SIP benefits for female investors
esakal
नेहा खंडेलवाल
आधुनिक भारतात महिला केवळ कमावत्या नसून, आर्थिक निर्णय प्रक्रियेतही सक्रिय आणि सक्षम भूमिका बजावत आहेत. आर्थिक स्वातंत्र्य, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन नियोजनाच्या माध्यमातून त्या स्वतःबरोबरच कुटुंबाची आर्थिक पायाभरणी मजबूत करत आहेत. बदलत्या आर्थिक परिदृश्यात महिलांचा वाढता सहभाग, त्यांची गुंतवणूकविषयक शिस्त आणि सक्षमीकरणाचा प्रवास याविषयी एलआयसी म्युच्युअल फंडाच्या वरिष्ठ क्रेटिड ॲनालिस्ट नेहा खंडेलवाल यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली मुलाखत...
प्रश्न : आधुनिक भारतातील कमावत्या महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे आहे?
नेहा : आधुनिक भारतातील महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि दीर्घकालीन सुरक्षिततेची हमी मिळते. जेव्हा एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असते, तेव्हा ती केवळ कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालत नाही, तर महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांमध्येही सक्रिय भूमिका बजावते. यामुळे कुटुंबाची एकूण आर्थिक ताकद वाढते. यामुळे महिलांना जीवनाच्या विविध टप्प्यात स्थैर्य लाभते. शिक्षण, विवाह, घर खरेदी, वाहन खरेदी यांसारख्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांसाठी आर्थिक नियोजन करणे शक्य होते, तसेच कुटुंबातील लहान व ज्येष्ठ सदस्यांची जबाबदारी सांभाळताना किंवा करिअरमध्ये ब्रेक घेताना आर्थिक आधार मिळतो. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास जीवनातील बदल अनिश्चिततेऐवजी तयारीने हाताळता येतात. आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ पैशांपुरते मर्यादित नसून, ते आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. आर्थिकदृष्ट्या सजग महिला कुटुंबासाठी मार्गदर्शक ठरते आणि बचत व गुंतवणुकीची शिस्त निर्माण करण्यात मदत करते. अशा महिलांचे आर्थिक वर्तन इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.