esakal | देवनागरीतील पहिल्या भगवद्‌गीतेची छपाई कोठे व कशी झाली?
sakal

बोलून बातमी शोधा

First Devnagari edition of Bhagwat Geeta printed in Miraj Sangli district}

सांगली जिल्ह्याने अनेक मातब्बर कलावंतांची देणगी महाराष्ट्राला दिली आहे. या जिल्ह्याला ‘कलावंतांचा जिल्हा’ किंवा ‘नाट्यपंढरी’ असे संबोधले जाते. त्यातच मिरज तालुक्याची एक खास वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ती म्हणजे भारतात पहिल्यांदा मिरजमध्ये भगवद्‌गीता छापली गेली आहे. 

देवनागरीतील पहिल्या भगवद्‌गीतेची छपाई कोठे व कशी झाली?

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

महाराष्ट्र राज्यातील सांगली एक जिल्हा आहे. सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. जिल्ह्याने अनेक मातब्बर कलावंतांची देणगी महाराष्ट्राला दिली आहे. या जिल्ह्याला ‘कलावंतांचा जिल्हा’ किंवा ‘नाट्यपंढरी’ असे संबोधले जाते. त्यातच मिरज तालुक्याची एक खास वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ती म्हणजे भारतात पहिल्यांदा मिरजमध्ये भगवद्‌गीता छापली गेली आहे. 

सांगली जिल्ह्यातील मिरज गावचा उल्लेख ‘मार्कंडेय मुनीक्षेत्रे’ म्हणून पूर्वी केला जात असे. भारतात पहिल्यांदा अन्य ठिकाणी इतर ग्रंथांची छपाई करण्यात आली असली तरी भगवद्‌गीता मात्र देशात पहिल्यांदा मिरजेत छापली गेली. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहातील हा एक अमूल्य ठेवा आहे. पहिली देवनागरी भाषेतील मुद्रित गीतेची प्रत मिरजेत असून त्याला तब्बल 216 वर्षे झाली आहेत. या भगवद्‌गीतेच्या शेवटच्या पानावर मुद्रणाच्या स्थळ काळाचा उल्लेख केला आहे. 

देशातील पहिले देवनागरी मुद्रण 1805 मध्ये मिरज येथे झाले. या पहिल्या मुद्रणाने जिल्ह्यात मुद्रणकलेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जिह्यात विविध भागात मुद्रणालये स्थापित झाली. ख्रिश्चनाचे बायबल व मुसलमांनाचे कुराण त्यांच्याप्रमाणे गीता हा हिंदूचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ मानला जातो. तब्बल 216 वर्षापूर्वी प्रथमच देवनागरी भाषेत मुद्रित झालेल्या आणि जगात एकमेव असलेल्या पहिल्या भगवद्‌गीतेची प्रत सध्या मिरजेत उपलब्ध आहे. भारतीय मुद्रण कलेचा अमूल्य ठेवा असणाऱ्या या ग्रंथाच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रासह जर्मनी, जापान, फ्रान्स, अमेरिका या भागातून अभ्यासक भेट देतात. मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे असलेली ही दुर्मिळ प्रत यापुढेही वर्षानुवर्षे जपण्याची गरज आहे.

भगवद्‌गीता हा जगामधील अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा ग्रंथ आहे. जगातील विविध देशातील व विविध धर्मांतील असंख्य शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामध्ये गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.

1805 मध्ये 100 प्रती छापल्या

मिरजमध्ये 1805 मध्ये  श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मण भिक्षुकांना दान देण्यासाठी100 प्रती छापल्या होत्या. त्यातील 99 प्रती नष्ट झाल्या आहेत. (त्या प्रती कुठे आहेत त्याची कल्पना कुणालाच नाही). त्या100 प्रतींपैकी शेवटची भगवद्‌गीतेची प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे आहे. 

भारतात सर्वप्रथम पोर्तुगीजांनी आणले छपाईचे तंत्रज्ञान 

भारतात सर्वप्रथम पोर्तुगीजांनी छपाईचे तंत्रज्ञान आणले. त्यानंतर सर्वांत मोठ्या प्रमाणावर पुस्तके छापणारी संस्था म्हणून विलियम कॅरे यांच्या अध्यक्षतेखालील सेरामपूर ऊर्फ श्रीरामपूर (प. बंगाल) येथील मिशन प्रेस ही सर्वांना परिचित आहे. दक्षिणेतही तमिळनाडू येथील तंजावर येथे महाराज सर्फोजीराजे दुसरे यांनी छापखाना सुरू केला होता. त्याच सुमारास मिरजेत ही भगवद्‌गीता छापली गेली.

तांब्याच्या पत्र्यावर ठसे उमटवून त्याद्वारे भगवद्‌गीता छापली

पुण्यात सवाई माधवरावाच्या दरबारात असणारे इंग्रज वकील चार्लस् मॅलेज यांनी नाना फडणवीस यांच्या सहकार्याने गीता देवनागरी भाषेत मुद्रित करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक फडणवीस यांचा मृत्यू झाल्याने त्याचे काम बंद झाले. याची माहिती मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन यांना कळाले. पटवर्धन यांनी एका तांबट कारागीराकडून तांब्याच्या पत्र्यावर ठसे उमटवून त्याद्वारे भगवद्‌गीता छापली. त्यांच्याकडून तांब्याच्या पत्र्यावर भगवद्‌गीता कोरून घेतली. त्यानंतर सुमारे शंभर प्रती मुद्रित करून घेतल्या. त्यातीलच एक प्रत सध्या मिरज संशोधन मंडळाकडे उपलब्ध आहे. देशातील हा पहिला ब्लॉक प्रिटींगचा नमुना होता. 

यावेळी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक मानसिंग कुमठेकर म्हणाले, भारतात पहिल्यांदा मिरजमध्ये भगवद्‌गीता छापली गेली. मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे असलेली भगवद्‌गीतेची छपाई ही भारतातील पहिल्या देवनागरी मुद्रणाचा पाया म्हणता येईल. या गावात याच्या100 प्रती छापल्या असून सध्या द्यात असलेली एकमेव प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहालयात आहे. हा राष्ट्रीय ठेवा आहे. जगभरातील अनेक संशोधक ही प्रत पाहण्यासाठी येतात.

go to top