
पक्षी पाहत असताना एक वेगळाच प्राणी हवेतून तरंगत आला. एका महाकाय वृक्षाच्या खोडावर चक्क नाहीसा झाला. आधी वाटले एखादा पक्षीच उडत आला असावा; पण ते ‘उडणे’ वेगळेच होते. पंखांची फडफड नव्हती. हवेत कागदाचे विमान सोडल्यावर जसे तरंगत जाईल त्याप्रमाणे ते उडणे होते. आमची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
ज्युनियर कॉलेजमध्ये असताना जीवशास्त्राच्या पुस्तकामध्ये एका ‘ड्रॅको’ नावाच्या प्राण्याची रेखाकृती पाहिली होती. ड्रॅको हे नाव लॅटिन भाषेतील ड्रॅकोनीस या मूळ शब्दावरून घेतले आहे व या शब्दाचा अर्थ ड्रॅगन किंवा सर्प असा होतो. रेखाकृतीवरून आकारमानाचा अंदाज आला नव्हता; पण हे काहीतरी विलक्षण असावे हे जाणवले होते. सरळ सोप्या भाषेत म्हणायचे तर ड्रॅको म्हणजे उडणारा सरडा. सरडा हा प्राणी उडू शकतो हेच मुळी तेव्हा विस्मयकारक वाटले होते. काही वर्षांनी जे. सी. डॅनियल यांनी लिहिलेले ‘बुक ऑफ इंडियन रेपटाईल्स’ (भारतातील सरपटणारे प्राणी) हे पुस्तक हाती लागले तेव्हा ड्रॅकोबद्दल अधिक माहिती मिळाली.
ड्रॅको सरडे दक्षिण आणि ईशान्य भारतातील जंगलात आढळतात. त्या पुस्तकात ड्रॅकोचे कृष्णधवल छायाचित्र होते. झाडाच्या खोडावर तो सरडा बसला होता; पण त्याच्या मातकट रंगसंगतीमुळे त्या छायाचित्रातही त्याला शोधणे कठीण जात होते. कधीतरी आपल्याला हा अजब प्राणी पाहायला मिळावा असे त्या वेळी वाटले होते. हे स्वप्न मात्र काही वर्षांनी पूर्ण झाले.