

Foreign Investment India
esakal
डॉ. दिलीप सातभाई - dvsatbhaiandco@gmail.com
परदेशी गुंतवणूकदार केवळ करामुळे भारतातून बाहेर पडत आहेत असे नाही. परंतु जागतिक निधीकडे अनेक पर्याय उपलब्ध असताना करातील हा फरक भारताच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम करतो याची नोंद घेण्यास अर्थ मंत्रालय कमी पडले आहे असे वाटते. गुंतवणूकदार अंतिम परतावा पाहतो आणि त्यावर कराचा थेट परिणाम होतो. परदेशी भांडवलाचा ओघ कमी झाल्याचा सर्वांत मोठा परिणाम भारतीय रुपयावर होतो. जेव्हा परकीय चलनाचा पुरवठा कमी होतो, तेव्हा रुपयावर दबाव वाढतो. रुपयाची घसरण हा केवळ चलन बाजारातील विषय नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक आहे.
गेल्या दोन दशकांत भारताने जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मजबूत आर्थिक वाढ, विशाल ग्राहक बाजारपेठ, तरुण लोकसंख्या आणि लोकशाही व्यवस्थेतील स्थैर्य यांमुळे भारत जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला. तथापि, गेल्या काही वर्षांत काही चिंताजनक आर्थिक संकेत दिसू लागले आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) भारतीय बाजारातील सहभाग कमी होत आहे, रुपयावर सातत्याने दबाव निर्माण होत आहे आणि बँकांना पुरेशा ठेवी आकर्षित करण्यासाठी झगडावे लागत आहे. या तीन घटना स्वतंत्र नसून त्या भारतीय अर्थव्यवस्थेत घडत असलेल्या एका मोठ्या संरचनात्मक बदलाच्या विविध बाजू आहेत. परदेशी गुंतवणूकदार भारतातून बाहेर पडत आहेत, याचे स्पष्टीकरण अनेकदा मजबूत होत असलेला डॉलर, जागतिक भू-राजकीय तणाव किंवा व्याजदरातील बदल यांपुरते मर्यादित ठेवले जाते. नुकतीच तैवान व दक्षिण कोरिया शेअर बाजाराने भारतीय बाजारापेक्षा वरचढ प्रगती दाखवून वरचा नंबर पटकावला याचेही कारण दिले जात आहे. तथापि, हे सर्व घटक महत्त्वाचे असले, तरी संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी जागतिक भांडवलाच्या बदलत्या प्रवाहाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.