Premium|Forest Rights Act : आदिवासींचा एल्गार; ‘तया पलाट हाय गं आमचं’ म्हणत जंगलाशी अतूट नात्याची हाक

Tribal Forest Rights : जंगल हे आदिवासींच्या उपजीविका, संस्कृती, श्रद्धा आणि अस्तित्वाचा आधार आहे. वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी व्यापक जनआंदोलनाची तयारी सुरू आहे.
Tribal Forest Rights

Tribal Forest Rights

sakal

Updated on

विवेक पंडित - pvivek2308@gmail.com

जंगल हे आदिवासींसाठी केवळ उपजीविकेचे साधन नाही; तर ती त्यांची ओळख, संस्कृती, श्रद्धा आणि अस्तित्वाची मुळं आहेत. वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि ऐतिहासिक अन्याय दूर करून नवा इतिहास निर्माण करण्याकरिता श्रमजीवी संघटना व्यापक आंदोलन उभं करण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे; कारण वनहक्काचं आदिवासींच्या जगण्यातलं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

महाभारताच्या शांतिपर्वात म्हटलंय,

‘अरण्ये निवसतः शान्तिः प्रकुर्यात् सुखमात्मनः |

न हिंसन्ति न हिंस्यन्ते वने सर्वत्र निर्भयाः |’

‘जंगलात राहणाऱ्या व्यक्तीला खरी सुख-शांती लाभते. तिथे राहणारे कोणाचीही हिंसा करीत नाहीत आणि तिथले हिंस्र पशूही तिथे राहणाऱ्यांची हिंसा करीत नाहीत. ते स्वतः वनात राहून वनाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत...’ आदिवासी आणि जंगल हे नातं असंच अतूट आहे.

आदिवासी हा निसर्गपूजक आहे. आदिवासीत वाघोबा देव, हिरवा देव, चेडोबा देव, पालघाता देवी पुजले जातात. हे सारे जंगलाचे रक्षक. विशेषतः पालघर जिल्ह्यात वारली समाजात ‘बातवाला’ असतो. बातवाला म्हणजे आदिवासींची परंपरा, पूर्वजांच्या इतिहासाची कथा सांगणारी ज्येष्ठ व्यक्ती. एखाद्या घरी मयत झालं की रात्र जागवली जाते. रात्र जागवताना हा ‘बातवाला’ मनुष्याच्या जन्म-मृत्यूचे चक्र महाभारतातील पांडवांच्या कथेमध्ये गुंफून सांगतो. या त्याच्या कथेतले पांडव हे राजगृहात राहणारे राजपुत्र नसतात; तर ते सह्याद्रीच्या घनदाट जंगलात राहणारे वनवासी असतात. हे पांडव आदिवासींचे मार्गदर्शक आहेत, ज्यांच्याकडून त्याने वनांशी सहजीवनाची शिकवण घेतली आहे. आदिवासींच्या साऱ्या लोककथा या जंगलाशी जोडलेल्या... अगदी महाभारत-रामायणही! दारिद्र्यामुळे भुकेशी झुंज हा स्थायीभाव असल्याने दिवसभर राबून थकलेला आदिवासी श्रमपरिहारासाठी सामूहिक नृत्य करतो. पालघर भागात त्याला गौरी नाच, कामडी नाच, तारपा नाच म्हणतात. या नाचाची गाणीही जंगलाशी जोडलेली आहेत. त्यामुळे आदिवासी आणि जंगल यांतला एकजिनसीपणा अत्यंत स्वाभाविक आणि उत्कट आहे. आदिवासी जन्माला येतानाच या सहअस्तित्वाचं गुणसूत्र घेऊनच जन्माला येतो. त्यामुळे ‘न हिंसयन्ति वनम्’ हा त्यांच्या जीवनपद्धतीचा गाभा आहे. त्यामुळे वनापासून आदिवासीला बेदखल करणं म्हणजे त्याचा आत्मा त्याच्या देहापासून विलग करण्यासारखं आहे. नेमका हाच धागा संघटनेने ऐंशीच्या दशकात पकडला आणि संघटनेचा वन अधिकारासाठीचा संघर्ष सुरू झाला, जो अजूनपर्यंत अव्याहत सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com