

Dnyaneshwari Marathi Literature
esakal
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यंदा ७५० वर्षे होत आहेत. म्हणजेच हे समाधीचे सप्तशतकोत्तर सुवर्ण वर्ष आहे. योगायोगाने नुकतेच अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्याला आवडलेल्या गीतांमध्ये ज्ञानेश्वरीच्या ‘पसायदाना’चा उल्लेख केला आहे. राजकीय किंवा इतर
स्वरूपाचे मतभेद गृहीत धरूनही एक बाब निदर्शनास आणायला हवी, ती ही की, ओबामा यांना जगभर आदराने पाहिले जाते व त्यांची मते आणि कृती गंभीरपणे घेतली जाते. साहजिकच या उल्लेखामुळे मराठी माणसाची मने नक्कीच सुखावली असणार.
पूर्वीच्या काळी एखाद्या ग्रंथाचा समारोप करताना, तो ग्रंथ वाचत असताना काय फळ मिळेल, याचा उल्लेख केला जाई. या प्रकाराला फलश्रुती असे म्हणत. कधी कधी प्रार्थनासुद्धा केली जाई. पसायदान ही अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ या मराठी गीताभाष्याच्या समाप्तीच्या वेळी केलेली प्रार्थना आहे. श्रेष्ठ अशा दैवी शक्तीची प्रार्थना करून तिच्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घेणे यात नवे काहीच नाही. जगभर माणसे असे साकडे घालताना वारंवार दिसून येतात. पसायदान ही अशा प्रकारची प्रार्थना नाही. ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. इतकेच नव्हे तर त्यांचे मागणे नाथपंथीय, वारकरी सांप्रदायिक, महाराष्ट्रातील माणसे किंवा हिंदू धर्मीय अशा समूहांपुरतेही नाही. ते जे मागतात ते विश्वातील यच्चयावत मनुष्यासह वर्तमान भूतमात्रांसाठी आहे. म्हणजेच ती प्रार्थना विश्वप्रार्थना आहे. तिचा कोणत्याही धर्माशी वा पंथाशी संबंध नाही. हा मुद्दा ओबामा यांच्या बरोबर लक्षात आला व त्यासंबंधीची आदरयुक्त आवडीची भावना त्यांनी व्यक्त केली.