

France Student Protests and Education Crisis
esakal
रोहिणी गोसावी - sakal.avtaran@gmail.com
फ्रान्समध्ये शाळांमधील शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या सुविधा आणि शिक्षणासाठी निधीची मागणी करीत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. भारतातही विद्यार्थ्यांचा असंतोष वेगवेगळ्या प्रश्नांतून व्यक्त झाला आहे. दोन्ही देशांतील प्रश्न वेगळे असले, तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णयांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिक्षणव्यवस्थेवरील विश्वास यांचे महत्त्व अधोरेखित होते. फ्रान्समधील विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचे द्योतक आहे.
सप्टेंबरमध्ये फ्रान्समध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. मात्र, महिनाभराच्या आतच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पॅरिसच्या उपनगरातील क्रेतेईमधील (Créteil) एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वार बंद करून आंदोलन सुरू केले. शाळेत पुरेसे शिक्षक नसणे आणि वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची गर्दी असणे इत्यादी प्रश्नांवरून सुरू झालेले त्यांचे आंदोलन हळूहळू पॅरिसमधील अनेक शाळांमध्ये पसरले. पुढे आंदोलनाने व्यापक स्वरूप धारण केले आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
आठवडाभरातच फ्रान्समधील इतर शहरांतील विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले. लिऑन, मार्सेई, नॉन्त आणि तुलूजसारख्या प्रमुख शहरांमध्येही आंदोलनाचे लोण पसरले. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तर अनेक शाळांचे कामकाज ठप्प झाले. पाहता पाहता काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चकमकी झाल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि लाठीमारही केला. या झटापटींत काही विद्यार्थी जखमी झाले, तर अनेकांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचाही समावेश होता. आतापर्यंत जवळपास सहा हजार आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे.