
अविरत गतिमान काळ आपल्या प्रत्येक टप्प्यात नाना प्रकारची भीती जन्माला घालतो आणि ती भीती तत्कालीन माणसांचे वर्तमान ग्रासून टाकते. ‘सध्या तर या भयकारी वर्तमानाचा कहर झाला आहे,’ असे गेल्या कैक टप्प्यातल्या माणसांस अनेकदा वाटून गेले असेल.
अमेरिका सापडली तेव्हाच कुणा द्रष्ट्यास, प्रलयक्षण तो हाच असे खात्रीने वाटले असेल. मग महायुद्धे आणि दुष्काळांच्या काळात, परचक्रे आणि यादव्यांच्या काळात, अणुबॉम्ब पडला त्या दिवसात किंवा प्लेग, कॉलरा अन् कोरोनासारख्या महामाऱ्यांच्या वर्षातही अनेकांना मानवी अस्तित्वासंबंधी विविध प्रकारची भीती वाटून गेली असेलच. तेव्हा, वर्तमान भयकारी असणे वा भासणे हे माणसांबाबत नित्याचे रहाटगाडगेच आहे, असे वाटते.
चार दिवसांपूर्वी ज्यांनी मुंबईत पाऊस झेलला त्यांना किंवा मुखेडमध्ये कोसळते आकाश झेलताना जे वाकले, त्यांना उत्तराखंडात डोंगर गावावर धावून येताना थिजून जाणाऱ्यांना किंवा गाझा, युक्रेन, इराण अन् रशियात बदाबदा बॉम्बवर्षाव होताना पळता भुई थोडी होणाऱ्यांना भयाचे नानाविध प्रकार अनुभवायला मिळाले असतीलच. हाच तो, हाच तो प्रलय क्षण ! असेही वाटून गेले असेल.